पुणे : जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अवकाशाबद्दल कुतूहल निर्माण व्हावे तसेच बालवयातच अवकाश संशाेधनाची गाेडी लागावी यासाठी परीक्षेद्वारे विद्यार्थ्यांची निवड करीत इस्रो या अवकाश संशाेधन संस्थेला शैक्षणिक भेट देणे तसेच शंभर शाळांमध्ये वैज्ञानिक प्रयाेगशाळा उभारणीसाठी नियाेजन केले जात आहे. या अनाेख्या उपक्रमासाठी सुमारे दाेन काेटींचा निधी लागणार असून जिल्हा नियाेजन अधिकारी कार्यालयाकडे निधीच्या मागणीचा प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी दिली.
जिल्ह्यातील ३ हजार ६२१ जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्राथमिक शिक्षण विभागाने विविध उपक्रम राबविण्याचे नियाेजन केले आहे. त्यापैकी बंगळुरू येथील इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो) या अवकाश संशाेधन संस्थेने शैक्षणिक भेट सहल ही पाच दिवसाची असेल. त्यामध्ये इस्रोच्या स्थापनेपासूनचा इतिहास, आजपर्यंत केलेल्या अवकाश संशाेधन माेहिमा, संस्थांमध्ये संशाेधन कसे केले जाते ? शास्त्रज्ञ कसे काम करतात ? अवकाश संशाेधनात करिअर कसे करावे ? त्यासाठी शिक्षण आणि विविध परीक्षा आदींबाबतची माहिती मिळण्यास मदत हाेईल आणि या भेटीमुळे अवकाशाबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात कुतूहल निर्माण हाेण्यासह त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि भविष्यात शास्त्रज्ञ निर्माण हाेण्यासाठी माेलाची मदत हाेणार आहे.
झेडपी शाळांमधील मुलांचे वाचन, लेखन, गणन इ. पायाभूत कौशल्य विकसित व्हावेत यासाठी शंभर दिवसांचा निपुण भारत गुणवत्ता वृद्धी कार्यक्रम, इंग्रजी अध्ययन समृद्धी कार्यक्रम, इयत्ता ५ वी आणि ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी चार पूर्वपरीक्षा, मराठी भाषा दिनी दि. २७ फेब्रुवारी २०२५ रोजी विद्यार्थी व शिक्षकांचे जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाचे आयाेजन. शाळांमधील शैक्षणिक व भाैतिक सुविधांच्या विकासासाठी सीएसआर निधी मिळविणे. तसेच शिक्षक प्रशिक्षण कक्षाच्या उभारणीसाठी निधी मागणीचा प्रस्ताव तयार केला आहे.
कशी हाेणार विद्यार्थ्यांची निवड ?
अवकाश संशाेधन संस्था शैक्षणिक भेटीसाठी जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या ५० गुणवंत विद्यार्थ्यांची निवड केली जाईल. त्यासाठी केंद्रस्तर, बीटस्तर, तालुकास्तर व जिल्हास्तरावरून विज्ञान व गणित या अभ्यासक्रमावर आधारित लेखी परीक्षा घेऊन निवड प्रक्रिया राबविली जाणार आहे.
इस्रो अवकाश संशोधन संस्थाना शैक्षणिक भेट देण्यासाठी जिल्हा परिषद शाळेतील ५० विद्यार्थ्यांचा संच घेऊन जाण्याचे नियोजन करण्यात येत आहे. तसेच शंभर शाळांमध्ये वैज्ञानिक प्रयाेगशाळा उभारणी करणे या उपक्रमासाठी दाेन काेटी रुपये निधीची मागणी जिल्हा नियोजन कार्यालयाकडे करणार आहाेत.
- संजय नाईकडे, शिक्षणाधिकारी, प्राथमिक, पुणे जिल्हा परिषद.