पुणे: जिल्हा परिषदेच्या जवळपास ३ हजार ६४८ शाळांपैकी जवळपास १ हजार ७९५ शाळांमधील स्वच्छतागृहांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. चांगले स्वछतागृह नसल्याने अनेक शाळांत विद्यार्थ्यांना नैसर्गिक विधी हे शाळेच्या आवारातच उरकावे लागत आहे, यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. १ हजार ७९५ नादुरुस्त स्वछतागृहांपैकी १ हजार ३३४ ची तातडीने दुरुस्ती करणे गरजेचे आहे.
जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांतील मोडकळीस आलेल्या स्वच्छतागृहांची माहिती मुख्याध्यापकांकडून ऑनलाईन मागण्यात आली होती. त्यातून हा प्रकार उघडकीस आला आहे. या शाळांमध्ये नैसर्गिक विधीसाठी मुलांसाठी आणि मुलींसाठी स्वतंत्र असे एक एक युनिट उभारण्यात आले आहे. मात्र, या स्वच्छतागृहांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. ३ हजार ६४८ शाळांपैकी मुलांचे ६६४ तर मुलींच्या ६७० स्वच्छतागृहांची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. त्यांची तातडीने दुरुस्तीची गरज आहे. या स्वच्छतागृहांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेने ७ कोटी ७ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. तर नव्याने स्वच्छतागृह बांधण्यासाठी १२ कोटी ६७ लाख ७५ हजार असे १९ कोटी ७५ लाख ७० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. लवकरच स्वच्छतागृहांच्या दुरुस्तीला सुरुवात करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी दिली.
तालुका दुरवस्था झालेली स्वच्छतागृहे मोडकळीस आलेली स्वच्छतागृहे
आंबेगाव - ८० ३९
बारामती - ८३ ४४
भोर ९३ ६९
दौंड - ९८ ३९
हवेली १०१ ९
इंदापूर ११७ ४६
जुन्नर - १६० ३४
खेड - १२४ ५७
मावळ - १२३ १६
मुळशी ९४ २१
पुरंदर - १०२ ३३
शिरूर ६९ २४
वेल्हे - ८९ ३०
जिल्हा परिषदेच्या एकूण शाळा - ३६४८
दुरवस्था झालेली स्वच्छतागृहे - १७९५
मोडकळीस आलेली स्वच्छतागृहे - ४६१
तातडीची दुरुस्ती आवश्यक असलेली स्वच्छतागृहे - १३३४
दुरुस्तीसाठी निधी - ७ कोटी ७ लाख ९५ हजार रुपये
नव्याने स्वच्छतागृहे उभारणे - १२ कोटी ६७ लाख ७५ हजार रुपये
___________________
शाळांतील नादुरुस्त असलेल्या स्वच्छतागृहांची माहिती मुख्याध्यापकांकडून मागवण्यात आली होती. त्यानुसार १ हजार ७९५ स्वच्छतागृहे नादुरुस्त असल्याची माहिती पुढे आली. तर काही ठिकाणी नव्याने उभारण्याची गरज आहे.
स्वच्छतागृहांच्या दुरुस्तीसाठी आणि नव्याने स्वच्छतागृह बांधण्यासाठी अंदाजपत्रक तयार केले आहे. त्यानुसार दुरुस्तीसाठी ७ कोटी सात लाख ९५ हजार रुपये तर, मोडकळीस आलेल्या स्वच्छतागृहांचे नव्याने बांधकाम करण्यासाठी १२ कोटी ६७ लाख ७५ हजार रुपयांची तरतूद केली जाणार आहे.
- रणजित शिवतरे, उपाध्यक्ष जिल्हा परिषद