माथेरानच्या रस्त्यांसाठी १४३ कोटींचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 11:36 PM2019-07-24T23:36:09+5:302019-07-24T23:36:19+5:30
नगरपालिका करणार काम : पावसाळ्यात धूप होऊन रस्ते होतात खराब
नेरळ : माथेरानमध्ये मुसळधार पाऊस पडतो, चार महिन्यात २०० इंचपेक्षा जास्त पाऊस पडतो. येथील उतार भाग असल्याने पावसामुळे रस्त्यांची धूप होते व रस्ते खराब होतात ही दरवर्षीची परिस्थिती बदलण्यासाठी माथेरान नगरपालिकेने अंतर्गत रस्त्यांसाठी १४३ कोटींचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर केला आहे.
माथेरान हे पर्यटनस्थळ असल्याने येथे लाखो पर्यटक निसर्गाचा मनमुराद आनंद घेण्यासाठी येतात. पावसाळ्यातील पर्यटन हंगामात तर पर्यटक तुफान गर्दी करतात. पण येथे मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे येथील रस्त्यांची दरवर्षी वाताहत होते व नगरपालिकेला दरवर्षी या रस्त्यांची डागडुजी करून आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. यासाठी नगरपालिकेने एमएमआरडीएच्या माध्यमातून अंतर्गत रस्त्यासाठी १४३ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करून तो प्रस्ताव एमएमआरडीएचे अध्यक्ष तसेच मुख्यमंत्री यांच्याकडे दिला आहे.
यामध्ये एकूण ३५ अंतर्गत रस्त्यांचा समावेश करण्यात आला आहे. प्रत्येक पावसात येथील रस्त्यांची धूप होते. रस्त्यांना चर पडतात परिणामी पर्यटकांना चालणे जोखमीचे ठरते. रस्ते सुस्थितीत राहावे यासाठी येथील पर्यावरणप्रेमींनी श्रमदान करून रस्ते सुस्थितीत ठेवण्याचा प्रयत्न केला.तर काही ठिकाणी नगरपालिका स्वत: मनुष्यबळ लावून रस्ते दुरुस्त करते.यामध्ये नगरपालिकेचा पैसा मोठ्या प्रमाणात खर्च होतो.
दरवर्षी जोरदार पावसामुळे माथेरानच्या रस्त्यांची वाताहत होते. जमिनीची धूप सुद्धा मोठ्या प्रमाणात होते ही गंभीर समस्या माथेरानसाठी घातक असून या रस्त्यांना सुस्थितीत आणण्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांच्या अधिपत्याखाली असलेली मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे प्रस्ताव दाखल केला आहे व मुख्यमंत्र्यांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.त्यामुळे २०२३ पर्यंत माथेरानमधील अंतर्गत रस्ते हे धूळ विरहित होऊन पावसापासून जमिनीची धूप होणेही वाचून माथेरानवरील संकट दूर होईल. - प्रेरणा सावंत,
नगराध्यक्षा, माथेरान