शाळेसाठी १ लाख १ हजारांचा निधी
By admin | Published: March 5, 2017 02:40 AM2017-03-05T02:40:21+5:302017-03-05T02:40:21+5:30
आजकाल राजकारणी वा नेते मंडळीकडून जन्मदिनानिमित्त लाखो रुपये खर्च करून बॅनर्स, पाट्यांचे आयोजन करण्यात येते. मात्र, महाराष्ट्र विधानसभेचे माजी विरोधीपक्ष नेते
- जयंत धुळप, अलिबाग
आजकाल राजकारणी वा नेते मंडळीकडून जन्मदिनानिमित्त लाखो रुपये खर्च करून बॅनर्स, पाट्यांचे आयोजन करण्यात येते. मात्र, महाराष्ट्र विधानसभेचे माजी विरोधीपक्ष नेते आणि कोकण एज्युकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष अॅड. दत्ता पाटील यांचे चिरंजीव आणि कोकण एज्युकेशन सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष संजय दत्ता पाटील यांनी गेल्या पाच वर्षांपासून ही परंपरा मोडीत काढली आहे.
अॅड. दत्ता पाटील यांच्या जयंतीनिमित्त स्वउत्पन्नातून १ लाख १ हजारांचा भौतिक सुविधा विकास निधी कोकण एज्युकेशन सोयायटीच्याच एका शाळेस देण्याची आगळी परंपरा संदीप यांनी निर्माण केली आहे. यंदा दत्ता पाटील यांच्या ९१व्या जयंती दिनी अलिबाग तालुक्यांतील परहूरपाडा येथील धनुर्धर शंकर खोपकर माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सरला किणी यांना या निधीचा धनादेश कोएसोचे नूतन संचालक सिद्धार्थ संजय पाटील यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.
कोएसाच्या मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात अॅड. दत्ता पाटील यांच्या पुतळ््यास पुष्पहार अर्पण केल्यावर आदरांजली अर्पण करण्यात आली. या वेळी कार्यवाह अजित शाह, जनता शिक्षण मंडळाच्या संचालक शारदा धुळप, कोएसोचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक खोपकर, कोएसो माध्यमिक शाळा प्रशासन अधिकारी कृष्णा म्हात्रे व अशोक गावडे, कोएसो प्राथमिक शाळा प्रशासन अधिकारी संजीवनी जोशी, कोएसो इंग्रजी माध्यम शाळा प्रशासन अधिकारी अनीता पाटील व अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
ग्रामीण विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास डोळ्यासमोर ठेवून अॅड. दत्ता पाटील यांनी मोठे काम केले आहे. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा एक भाग म्हणून त्यांच्या जन्मदिनी २0१२ या वर्षापासून कोकण एज्युकेशन सोसायटीतील एका शाळेला मूलभूत, भौतिक सुविधा पूर्ण करण्यासाठी रु १ लाख १ हजारांचा निधी स्वउत्पन्नातून देण्याचा संकल्प सुरू केल्याचे संदीप यांनी सांगितले.
भौतिक सुविधा विकास निधीचे यंदाचे सहावे वर्ष
संजय दत्ता पाटील यांच्या संकल्पानुसार भौतिक सुविधा विकास निधीचे यंदाचे सहावे वर्ष आहे. २०१२मध्ये कोएसो मांडला माध्यमिक शाळा (महाड), २०१३मध्ये कोएसो प्रभाकर पाटील मा. शाळा, काळसुरी (म्हसळा), २०१४मध्ये कोएसो गुरुदत्त माध्यमिक विद्यालय, वाकी (महाड), २०१५मध्ये कोएसो नारायण गायकर मा.शा., वळके (मुरुड), २०१६मध्ये को.ए.सो. माध्यमिक शाळा, माणकुले (अलिबाग) तर यंदा या संकल्पांतर्गत को.ए.सो.धनुर्धर शंकर खोपकर माध्यमिक शाळा, परहूरपाडा (अलिबाग) या शाळेस रु. १ लाख १ हजारांचा निधी देण्यात आला आहे.