जिल्ह्यात 1 लाख 2 हजार 852 गणेशमुर्तींची होणार प्रतिष्ठापना, बाजारात अजुनही गर्दी
By निखिल म्हात्रे | Published: September 18, 2023 03:16 PM2023-09-18T15:16:29+5:302023-09-18T15:17:10+5:30
काेकणसह मुंबईत गणेशाेत्सव अतिशय जल्लाेषात साजरा करण्याची परंपरा
निखिल म्हात्रे, लोकमत न्युज नेटवर्क, अलिबाग: जिल्ह्यामध्ये तब्बल 1 लाख 2 हजार 852 गणेशमुर्तींची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. त्यामध्ये 271 सार्वजनिक तर, 1 लाख 2 हजार 581 खासगी गणेश मुर्तींचा समावेश आहे. गणरायाच्या आगमनानंतर चाैथ्या दिवशी 14 हजार 455 गाैरींचा मुक्कामही गणेश भक्तांच्या घरी राहणार आहे. बाप्पाच्या तयारीसाठी लागणाऱ्या विविध साहित्याच्या खरेदीसाठी बाजारामध्ये चांगलीच गर्दी अनुभवाला मिळाली.
काेकणामध्ये गणेशाेत्सव अतिशय जल्लाेषात साजरा करण्याची परंपरा आहे. आगरी, काेळी, माळी, ब्राह्मण, मराठा अशा विविध समाजातील गणेश भक्त गणेशाेत्सव हा सण म्हणून माेठ्या उत्साहाने साजरा करतात. गेल्या काही दिवसांपासून बाप्पाचे आगमन हाेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले हाेते. मंगळवारी भक्तांची उत्कंठा बाप्पाच्या आगमनाने संपणार आहे. त्यानंतर पुढचे काही दिवस ताे गणरायाच्या भक्तीमध्ये तल्लीन हाेणार आहे.
पाैराहित्य करणाऱ्यांची संख्या कमी असल्याने गेल्या काही वर्षापासून गणारायाच्या प्रतिष्ठापनेच्या पुजेसाठी कमतरता जाणवते. याकालावधी त्यांना प्रचंड मागणी असल्याने पाैराहित्य करणारऱ्यांना सर्वांच्याच वेळा पाळणे शक्य हाेत नाही. यावर उपाय म्हणून सिडी अथाव पुस्तकांमध्ये वाचून पुजा सांगण्याचा ट्रेंड पहायला मिळत आहे. पाैराहित्य करणाऱ्याची वाट बघत बाप्पाच्या मुर्तीला तात्कळत ठेवणे याेग्य वाटत नसल्याचे काही गणेश भक्त सांगतात. त्यामुळे असा पर्याय निवडावा लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यामध्ये तब्बल 1 लाख 2 हजार 852 गणेशमुर्तींची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. त्यामध्ये 271 सार्वजनिक तर, 1 लाख 2 हजार 581 खासगी मुर्तींचा समावेश आहे. दीड दिवसांचे 10 सार्वजनिक तर 25 हजार 614 खाजगी गणरायाच्या मुर्ती आहेत. पाच दिवसांच्या 72 सार्वजनिक आणि 58 हजार 666 खासगी, सात दिवसांचे 14 सार्वजनिक तर, 211 खासगी मुर्तींचा समावेश आहे. दहा दिवसांचे तब्बल 151 सार्वजनिक आणि 17 हजार 393 खासगी गणेशमुर्तींचे जिल्ह्यात आगमन हाेणार आहे. तसेच तीन हजार गाैरीचे आगमन चाैथ्या दिवशी हाेणार आहे.