अलिबाग - रायगड जिल्हयात यंदाच्या दिवाळसणासाठी आलेला आनंदाचा शिधा रेशन दुकानांपर्यंत वेळेत पोहोचला. मात्र आतापर्यंत जवळपास 72 टक्के कुटुंबांनी या कीटसचा लाभ घेतला. लाभ घेतलेल्या कुटुंबांची संख्या 3 लाख 8 हजार 632 इतकी आहे. जवळपास 1 लाख 21 हजार कुटुंबे अजूनही या योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. त्यामुळे या योजनेचा मूळ हेतूच साध्य होताना दिसत नाही.
गणेशोत्सवानंतर दिवाळीतही आनंदाचा शिधा पुरवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. रायगड जिल्ह्यातील 4 लाख 30 हजार 81 कुटुंबे या योजनेचे लाभार्थी आहेत. या कुटुंबांची दिवाळी आनंदात जावी हा या योजनेमागचा उद्देश होता. दिवाळीपूर्वी हे सर्व जिन्नस लाभार्थ्यांना मिळतील असा पुरवठा विभागाचा प्रयत्न होता. त्यासाठी आवश्यक किट्स रेशन दुकानांपर्यंत वेळेत पोहोचवण्यास राज्य सरकार आणि पुरवठा विभाग अपयशी ठरले. उशिरा आलेल्या किट्सचे ज्या वेगाने त्याचे वितरण व्हायला हवे होते तसे ते झाल्याचे दिसत नाही. एकाच ठेकेदाराकडे अनेक जिल्हयात पुरवठयाची कामे दिली जातात. त्याचा परीणाम पुरवठ्यावर होत असल्याचे सांगितले जाते.
अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब गटातील लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो. साधारणपणे ही कुटुंबे 4 लाख 30 हजारांच्या आसपास आहेत.यामध्ये 1 किलो साखर, 1 लीटर पामतेल तर पोहा, मैदा, रवा आणि चणाडाळ हे जिन्नस प्रत्येकी अर्धा किलो असे कीटस बनवण्यात आले आणि हे सर्व अवघ्या 100 रूपयांत उपलब्ध करून देण्यात आले. परंतु हे सर्व किट्समधील जिन्नस एकाच वेळी उपलब्ध झाले नाहीत. शिवाय हे जिन्नस ज्या पि शव्यांमध्ये घालून द्यायचे असतात त्या पि शव्यादेखील वेळेत उपलब्ध झाल्या नाहीत.
रायगड जिल्ह्यात लाभार्थी कुटुंबांच्या संख्येनुसार कीटस उपलब्ध झाले . 4 लाख 30 हजार 81 पैकी 3 लाख 8 हजार 632 कीटसचे वितरण अद्याप पर्यंत झाले आहे. तर 1 लाख 21 हजार 449 कीटसचे वितरण अद्याप बाकी आहे. दिवाळी संपून काही दिवस उलटले तरीदेखील अनेक कुटुंबे आनंदाचा शिधाच्या कीटपासून वंचित असल्याचे पहायला मिळते. पुरवठा विभागाचे अधिकारी यासंदर्भात वारंवार आढावा घेत असतात. वितरणात येणारया त्रुटी समजून घेवून त्यावर मार्गदर्शन करत असतात.
रेशनवरील अन्नधान्याचे वितरण हे पॉस मशिनवर केले जाते. अनेकदा इंटरनेट सुवि धेअभावी त्यात अडथळे येत असतात. त्यामुळे ऑनलाइन बरोबरच ऑफलाइन वितरण करण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या. तरीही वितरणाचा अपेक्षित टप्पा गाठता आलेला नाही. पोलादपूर तालुक्यात सर्वांत कमी लाभार्थी असले तरी तेथे सर्वाधिक म्हणजे 93.66 टक्के कीटसचे वितरण झाले आहे. तर तळा तालुक्यात सर्वांत कमी म्हणजे 49.29 टक्केच वितरण करण्यात पुरवठा विभागाला यश आले आहे. तालुकावार आकडेवारी पाहिली तर ग्रामीण भागात या योजनेला चांगला प्रतिसाद मिळतो आहे मात्र शहरी आणि निमशहरी भागात लाभार्थ्यांचा अपेक्षित प्रतिसाद पहायला मिळत नाही.
गणेशोत्सवात देखील आनंदाचा शिधा लोकापर्यंत वेळेत पोहोचला नव्हता. तोच अनुभव दिवाळीतदेखील आला आहे. गोरगरीब सामान्य कुटुंबांना सणवार आनंदात साजरा करता यावेत हा हेतू ठेवून सरकारने सुरू केलेली ही योजना निश्चितच स्वागतार्ह आहे परंतु हे जिन्नस वेळेत त्या कुटुंबांना उपलब्ध होत नाहीत, ही खेदाची बाब असून पुढील सणासुदीला सरकारने याचे नियोजन करून वेळेत किट्स उपलब्ध होतील याची काळजी घेणे आवश्यक असल्याची मागणी आता होत आहे.
लाभार्थी संख्या - 4 लाख 30 हजार 81प्रत्यक्ष वितरण - 3 लाख 8 हजार 632प्रलंबित वितरण - 1 लाख 21 हजार 449
आनंदाचा शिधाचे जिन्नस नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडयात मिळाले असते तर दिवाळीपूर्वी वितरण करणे शक्य झाले असते. मात्र ते अपेक्षित वेळेत न येता टप्प्याटप्प्याने आले त्यामुळे उशिर झाला. 30 नोव्हेंबरपर्यंत 100 टक्के वितरण पूर्ण होईल.- श्रीकांत कवळे, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी.