पाणीटंचाई निवारणासाठी कर्जतमध्ये ५० लाखांचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 10:43 PM2020-02-22T22:43:32+5:302020-02-22T22:43:35+5:30
महेंद्र थोरवे यांचा पाहणी दौरा; ग्रामस्थांच्या समस्या सोडविण्याचे दिले आश्वासन
कर्जत : तालुक्यातील एकही गाव आणि वाडी पाणीटंचाईग्रस्त राहणार नाही, याची काळजी घेतली जाईल. यासाठी तात्पुरत्या स्वरूपात पाणीटंचाई दूर करण्यासाठी ५० लाखांचा आमदार निधी दिला जाईल, अशी माहिती कर्जतचे आमदार महेंद्र्र थोरवे यांनी दिली.
तालुक्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पाहणी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख आणि पाणीटंचाई निवारण समितीचे समन्वयक, जिल्हा परिषदेचे माजी सभापती उत्तम कोळंबे, तहसीलदार विक्रम देशमुख, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बाळाजी पुरी, निवासी नायब तहसीलदार सुधाकर राठोड, जिल्हा परिषद पाटबंधारे विभागाचे उपअभियंता आर. डी. कांबळे, बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रल्हाद गोपणे, शाखा अभियंता मते, सुजीत धनगर, आदिवासी विकास विभागाचे तांत्रिक अधिकारी भानुशाली यांच्यासह पाणीटंचाई विभागाचे स्थापत्य अभियांत्रिकी सहायक गोवर्धन नखाते, ग्रामसेवक आणि महसूल विभागाचे तलाठी सहभागी झाले होते.
कर्जत पंचायत समितीच्या सभापती सुजाता मनवे, उपसभापती भीमाबाई पवार, माजी उपसभापती सुषमा ठाकरे, सदस्या कविता ऐनकर, माजी सदस्य विष्णू झांजे, खांडसचे सरपंच मंगल ऐनकर, पाथरजच्या सरपंच घोडविंदे, अंभेरपाडा ग्रामपंचायतच्या सरपंच मयुरी तुंगे, मोग्रजच्या सरपंच रेखा देशमुख आदींसह स्थानिक कार्यकर्ते प्रकाश ऐनकर, भरत डोंगरे, प्रशांत झांजे, रवी ऐनकर, अंकुश घोडविंदे, संकेत भासे, अभिषेक सुर्वे आदी उपस्थित होते.
पाथरज ग्रामपंचायतमधील ताडवाडी आणि मोरेवाडी येथील भीषण पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पाथरज आश्रमशाळेच्या नळपाणी योजनेसाठी वापरण्यात येणाºया उद्भव विहिरीमध्ये पंप टाकून ते पाणी दोन इंची जलवाहिनीद्वारे दोन्ही वाड्यात आणले जाणार आहे. त्या दोन्ही वाड्यात तात्पुरत्या स्वरूपात साठवण टाक्यांमध्ये ते पाणी सोडले जाईल आणि त्या टाक्यांना नळ लावून पाणी नागरिकांना वितरित केले जाईल. दोन्ही वाड्यांसाठी प्रस्तावित ९३ लाख रुपये खर्चाच्या नळपाणी योजना मंजूर करून घेणार असल्याचे आश्वासन थोरवे यांनी दिले.
विहिर, बोअरवेल खोदून देणार
गावंडवाडी, खांडस ग्रामपंचायतमधील वडाचीवाडीमध्ये जाऊन थोरवे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. या वाड्यांमध्ये शासनाकडून एकदाही विहीर अथवा बोअरवेल खोदण्यासाठी निधी आलेला नाही, ही बाब समजताच नाल्यावर असलेल्या बंधाऱ्यांच्या खाली विहीर खोदून घेतली जाईल, असे आश्वासन थोरवे यांनी दिले.
पाझर तलावासाठी सर्व्हे
अंभेरपाडा ग्रामपंचायतमधील बेलाचीवाडी, काठेवाडी आणि अंभेरपाडा येथील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी जुना तलाव आहे, तेथे विहीर घ्यावी, अशी सूचना ग्रामस्थांनी केली. तर एक पाझर तलाव बांधण्यासाठी जागा असून सर्वेक्षणही झाले आहे. त्या ठिकाणी पाझर तलाव व्हावा, अशी मागणी त्या तिन्ही गावांतील नागरिकांनी केली. मोग्रज ग्रामपंचायतमधील पिंगळस येथील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी फार्म हाऊस मालकाने ताब्यात घेतलेली विहीर तत्काळ खुली करून देण्याच्या सूचना थोरवे यांनी तहसीलदार यांना केल्या आहेत.