स्टील मार्केट परिसरात बसविणार ६०० एलईडी; पथदिवे बसविण्याचे काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2020 12:02 AM2020-02-04T00:02:35+5:302020-02-04T00:03:29+5:30
दीड कोटींचा खर्च अपेक्षित
- अरुणकुमार मेहत्रे
कळंबोली : अशिया खंडातील मोठे मोठे स्टील मार्केट कळंबोलीत असून येथील पथदिवे बंद असल्याने वाहतूकदारांची गैरसोय होते. शिवाय रात्रीच्या वेळी अनेक छोटे-मोठे अपघात घडत असतात. नादुरुस्त पथदिव्यांबाबत वारंवार पाठपुराव्या केल्यानंतर सिडकोने परिसरात तीनशे खांबावर सहाशे एलईडी बसविण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे लवकरच स्टील मार्केटचा परिसर उजळणार आहे.
कळंबोली येथील ३०२ हेक्टर जमिनीवर १२५, २५०, ४५०, ९०० चौरस मीटर अशा वेगवेगळया आकाराचे १९६० भूखंड पाडण्यात आले. १९८० मध्ये सिडकोने भाडेकरार करून लीज तत्त्वावर हे भूखंड व्यापाऱ्यांना दिले. मात्र ठरल्याप्रमाणे इतर फारशा सुविधा देण्यात आल्या नाहीत. भूखंड निर्मितीखेरीज सिडको प्रशासनाने या ठिकाणी कोणत्याही सुविधा पुरवल्या नाहीत.
स्टील मार्केटमध्ये उद्यानासाठी राखीव असलेल्या जागेवर अतिक्रमण करून या ठिकाणी गॅरेज तसेच इतर दुकाने थाटण्यात आली आहेत. कुर्ल्यातील भंगारवाल्यांनी देखील कळंबोलीतील लोखंड बाजारात आपले बस्तान बसविले आहे. सिडकोच्या दुर्लक्षामुळे सध्या स्टील मार्केटमध्ये सुविधांची वानवाच झाल्याचे दिसून येत आहे. परिणामी वाहनचालक व व्यापाऱ्यांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
दहा वर्षांपूर्वी सिडकोने ६ कि.मी लांबाचा पेरीफेरी रस्त्याचे काँक्रीटीकरण केले होते. त्याची रुंदी आता वाढविण्यात आली आहे. सिडकोने याकरीता जवळपास शंभर कोटी खर्च केले. त्यानंतर सिडको आणि बाजार समितीने अंतर्गत रस्त्यांची काँक्रटीकरणाचे काम केले.
स्टील मार्केटचा परिसर बाजार समितीकडे हस्तांतरीत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. बाजार परिसरातील रस्त्यांवर पथदिवे नसल्याने रात्री मोठी गैरसोय होते. याबाबत लोह पोलाद बाजार समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास रसाळ यांनी सिडकोकडे पत्रव्यवहार केला होता.
महाराष्ट्र वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष गोविंद साबळे यांनीही दोनही यंत्रणांकडे पथदिवे बसविण्यासाठी पाठपुरावा केला होता. त्यानुसार सिडकोने पेरीफेरी रस्त्यावर पथदिवे बसविण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी निधीची तरतुद केली. कामालाही सुरूवात झाली. हे दिवे कार्यन्वित करून बाजार समितीकडे हस्तांतरीत केले जाणार आहेत.
लोह-पोलाद मार्केट सिडकोने विकसित केला आहे. त्यामुळे पायाभूत सुविधा विकसित करून ते आमच्याकडे वर्ग करणे क्रमप्राप्त आहे. लोह पोलाद बाजारात दिव्याबत्तीची सोय नव्हती, ही वस्तुस्थिती आहे. त्याप्रमाणे, सिडकोकडे पाठपुरावा केला असून, सध्या दिवे बसविण्याचे काम सुरू आहे.
- विकास रसाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी, लोह पोलाद बाजार समिती, कळंबोली.
१ कोटी ४७ लाखांचा खर्च
पेरीफेरी रस्त्याबरोबरच आतील रस्त्यांवर तीनशे खांब बसविण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी तुर्भे येथील जे.जे. इलेक्ट्रिकल कंपनीला काम देण्यात आले आहे. एका खांबाबर दोन एलईडी दिवे बसविण्यात येत आहेत. त्यांना वीजजोडणी करून लवकरच ते कार्यन्वित करण्यात येतील. यापुढे येणारे वीजबिल बाजार समिती भरणार आहे.