दिव्यांग मतदारांसाठी १ हजार ७७ व्हीलचेअर; जिल्हा प्रशासनाकडून सुविधा
By निखिल म्हात्रे | Published: April 2, 2024 05:27 PM2024-04-02T17:27:23+5:302024-04-02T17:27:46+5:30
जिल्हाधिकारी यांच्याकडून केंद्रांची पाहणी.
निखिल म्हात्रे, अलिबाग : दिव्यांग मतदारांना मतदान करता येणे सोयीचे व्हावे म्हणून त्यांना सर्व मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. ३२ रायगड लोकसभा मतदार संघात एकूण ११ हाजार २८२ मतदार असून त्यांना मतदान करण सोयीचे जाण्यासाठी १ हजार ७७ व्हीलचेअर उपलब्ध आहेत. त्यामुळे यावर्षी दिव्यांग मतदान वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन अग्रही असून छोट्या-छोट्या गोष्टींकडे गांभिर्याने पाहून तेथे सुधारणा करत आहेत.
जिल्हाधिकारी किशन जावळे प्रत्यक्ष मतदान केंद्रावर भेटी देऊन तेथील दिव्यांग मतदारांसाठी केलेल्या सोयी सुविधांची पहाणी करीत आहेत. याबरोबर दिव्यांग मतदारांना जाण्यासाठी रेलींग योग्य आहे का याची पहाणी करीत आहेत. तसेच दिव्यांग मतदारांसाठी दिव्यांग म्हणून नोंदणी करण्याची, नवीन मतदार नोंदणीसाठी, मत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हस्तांतरित करणे, मतदान केंद्र बदलाची व व्हील चेअरची विनंती करता येत असून मतदार यादीत नाव शोधण्याची, मतदान केंद्र जाणून घेणे, तक्रारी नोंदविणे, मतदान अधिकारी शोधणे, बूथ लोकेटर स्थिती तपासणे इत्यादी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. रायगड मतदार संघात एकूण ११ हजार २२८ दिव्यांग मतदार आहेत. यापैकी ४ हजार ४६३ महिला तर ६हजार ८१८ पुरुष मतदार आहेत.
दिव्यांग अधिकारी, कर्मचाऱ्यांबरोबरच दिव्यांग मतदारांसाठी जिल्हा प्रशासनाने मतदान केंद्रांवर सर्व सुविधा पुरविल्या आहेत. १० मतदारांमागे १ व्हीलचेअर्सची आवश्यकता असून, सध्या १ हजार ७७ व्हीलचेअर उपलब्ध आहेत. १५ तालुक्यांतील ८०७ ग्रामपंचायत क्षेत्रातील दिव्यांगांसाठी त्या उपयोगात आणल्या जाणार आहेत. ज्यांना दिव्यांग मतदारांना आपल्या अपंगत्वामुळे स्वत: मतदान केंद्रावर येणे शक्य नाही, अशा दिव्यांग मतदारांना ग्रामसेवकांनी स्थानिक वाहने उपलब्ध करून द्यायची आहेत.