मासेमारी करणाऱ्या १० चिनी जहाजांची रत्नागिरी समुद्रात घुसखोरी?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 05:12 AM2019-06-14T05:12:48+5:302019-06-14T05:13:31+5:30
तटरक्षक दलामुळे प्रकार उघडकीस; सहा दिवस उलटून कारवाई नाही
आविष्कार देसाई
अलिबाग : रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रामध्ये चिनी कंपनीच्या मासेमारी करणाºया १० जहाजांनी बेकायदा प्रवेश करून आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे. दोन जहाजांनी ६ जून रोजी तर आठ जहाजांनी १२ जून रोजी रत्नागिरी समुद्रात १२ नॉटीकल माईल क्षेत्रात प्रवेश केला. यातील काही जहाजातून सॅटेलाइट फोनचा वापर करून संदेश वहन केले जात असल्याचे भारतीय तटरक्षक दलाला त्यांच्या रडारवर आढळल्याने चीनच्या जहाजांच्या घुसखोरीचा प्रयत्न उघडकीस आल्याचे सूत्रांनी सांगितले. तब्बल सहा दिवस झाले तरी अद्याप त्या जहाजांवर कोणतीच कारवाई केली नसल्याचे समोर आले आहे. रत्नागिरी समुद्रात ती जहाजे सीज करण्यात आली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
फू युवान यू या चिनी कंपनीच्या २०० जहाज ताफा अरबी समुद्रातून फिशिंगसाठी निघाला होता. त्यातील १० जहाजांनी कायद्याचे उल्लंघन करत १२ नॉटीकल माइल क्षेत्रामध्ये प्रवेश केला. त्या जहाजांवर इंडोनेशिया आणि फिलीपाईन्स देशातील क्रू मेंबर असून त्यातील दोन जणांच्या पासपोर्टची मुदत संपल्याचे सांगितले जाते आहे. याबाबत रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. भारतीय तटरक्षक दलाचे रत्नागिरी जिल्ह्याचे प्रमुख अतुल दांडेकर यांच्याशी संपर्क साधला असता जिल्हाधिकाऱ्यांसोबत मिटिंगमध्ये असल्याचे सांगितले.चीन समुद्रावर अधिराज्य गाजवण्याच्या तयारीत असताना भारताला मात्र आपल्या आंतरराष्ट्रीय सीमा सुरक्षित करता आल्या नसल्याचे त्या निमित्ताने अधोरेखित होते.
उद्देशावर प्रश्नचिन्ह
२०० नॉटीकल माइलपर्यंत विविध देशातील जहाजांना समुद्रातून जाता येते, मात्र त्याच्या पुढे यायचे असल्यास संबंधित देशाची परवानगी घ्यावी लागते. तसेच दोन्ही देशाचे झेंडे जहाजावर लावणे बंधनकारक असते. मासेमारी करणाºया जहाजांना सॅटेलाइट फोन वापरण्याची परवानगी नसते. त्यामुळे चिनी जहाजे नेमक्या कोणत्या उद्देशासाठी भारतीय समुद्रात घुसले असा प्रश्न आहे.