वाढवण बंदरामुळे 10 लाख रोजगाराची निर्मिती, केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 12:48 PM2024-08-23T12:48:57+5:302024-08-23T12:49:14+5:30
जेएनपीए बंदरातील विविध विकासकामांचे उद्घाटन, भूमिपूजन, विविध कंपन्यांशी करार आदी कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
उरण : प्रस्तावित वाढवण बंदर हे जागतिक स्तरावरील मेगा पोर्ट ठरणार आहे. या बंदरामुळे १० लाख रोजगारांची निर्मिती होणार आहे. स्थानिक मासेमारीही सुरक्षित राखण्यात येईल, असा दावा केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी गुरुवारी उरण येथे पत्रकार परिषदेत केला.
जेएनपीए बंदरातील विविध विकासकामांचे उद्घाटन, भूमिपूजन, विविध कंपन्यांशी करार आदी कार्यक्रमांचे आयोजन केले होते. सोनोवाल यांनी बंदरातील विकासकामांचा आढावा घेऊन पुनरुज्जीवित केलेली जलाशये, पर्यावरणीय प्रकल्पाचे उद्घाटन, जसखार सरोवराचे भूमिपूजन केले. अतिरिक्त कार्गो लिक्विड जेट्टीच्या विस्ताराचीही घोषणा त्यांनी केली.
दरम्यान, जेएनपीए सेझमध्ये वाटप केलेल्या ७ भूखंडधारकांना यावेळी पत्रही जारी करण्यात आले. यावेळी जेएनपीए, वाढवण बंदर आणि आरईसी यांच्यातील विविध सुविधा प्रकल्पांना समर्थन देण्यासाठी दोन सामंजस्य करारावरही सोनोवाल यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या केल्या. पालघर, डहाणूवासीयांना सशक्त बनविण्यासाठी व प्रशिक्षण देण्यासाठी विकसित वाढवण स्किलिंग प्रोग्राम व्हॉट्सॲप चॅटबॉटचे मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटनही केले. याप्रसंगी खासदार श्रीरंग बारणे, महाराष्ट्र बंदर विभागाचे सचिव संजय सेठी, जेएनपीएचे अध्यक्ष उन्मेष वाघ उपस्थित होते.
मोदींचा पालघर दौरा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ३० ऑगस्ट रोजी प्रस्तावित पालघर जिल्हा दौरा असून, केंद्रीय बंदरे, जहाज व जलमार्गमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील हेलिपॅड आणि कार्यक्रम स्थळाची पाहणी करून आढावा घेतला.