पेण नगरविकास आघाडीच्या १० नगरसेवकांचे राजीनामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 02:27 AM2019-03-29T02:27:30+5:302019-03-29T02:27:50+5:30

पेण नगर परिषदेच्या नगरविकास आघाडीच्या ८ नगरसेवकांसह नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवलेले माजी नगराध्यक्ष संतोष शृंगारपुरे व पालिकेचे विरोधी पक्षनेते निवृत्ती पाटील यांच्या नगरविकास आघाडीच्या सर्व नगरसेवकांनी भाजपा पक्ष सदस्यत्वाचा राजीनाम देत भाजपाला रामराम ठोकला.

 10 municipal corporators of Pen Urban Development resign | पेण नगरविकास आघाडीच्या १० नगरसेवकांचे राजीनामे

पेण नगरविकास आघाडीच्या १० नगरसेवकांचे राजीनामे

googlenewsNext

पेण : पेण नगर परिषदेच्या नगरविकास आघाडीच्या ८ नगरसेवकांसह नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवलेले माजी नगराध्यक्ष संतोष शृंगारपुरे व पालिकेचे विरोधी पक्षनेते निवृत्ती पाटील यांच्या नगरविकास आघाडीच्या सर्व नगरसेवकांनी भाजपा पक्ष सदस्यत्वाचा राजीनाम देत भाजपाला रामराम ठोकला. एमएमआरडीए क्षेत्रातील विकासकामांच्या निधीबाबत अनेक वेळा प्रत्यक्ष गाठीभेटी व पत्रव्यवहार करूनसुद्धा भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी सहकार्य न केल्यामुळे आम्ही पक्ष सदस्यत्वाचे राजीनामे देत असल्याचे त्यांनी
म्हटले आहे. गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही माहिती दिली.
नगरसेवकांनी गेल्या अडीच वर्षांत अनेक विषयांशी संबंधित मदतीची अपेक्षा केलेली असताना ती मदत भाजपाच्या पक्षनेतृत्वाने केली नाही, असा आरोप नगरविकास आघाडीचे मुख्य समन्वयक संतोष शृंगारपुरे व विरोधी पक्षनेते निवृत्ती पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. त्याचबरोबर नगरपालिकेच्या वॉर्डमध्ये मतदारांना दिलेली आश्वासने व विकासकामांसाठी निधी तसेच एमएमआरडीए मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या फंडातून मोठ्या कामासाठी जी विकास निधीची आवश्यकता होती त्याबाबत अनेक वेळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्या कामाचे प्रस्ताव देऊनसुद्धा सदरचा विकास निधी आम्हाला पक्षश्रेष्ठीकडून प्राप्त झाला नाही. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत याबाबत अल्टिमेटम दिलेला होता. त्यानंतरदेखील याबाबतची दखल घेतली गेली नाही. अखेर आम्ही सर्व नगरसेवकांनी चर्चा करून हा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही सध्या कोणत्याही राजकीय पक्षात जाणार नाही. मात्र, आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांना पाठिंबा दिल्याचे त्यांनी जाहीर केले.

काँग्रेस विरुद्ध नगरविकास आघाडीची लढत
पेण नगर परिषद निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध नगरविकास आघाडी अशी चुरशीची लढत झाली होती. नगरविकास आघाडीचे थेट नगराध्यक्षपदाचे उमेदवार संतोष शृंगारपुरे यांना पेण शहरातून तब्बल १० हजारावर मताधिक्य मिळालेले होते. २ हजार मतांनी त्यांचा निसटता पराजय झाला होता. आघाडीचे भाजपाप्रणीत ७ नगरसेवक व मित्रपक्ष असलेल्या शेकाप पक्षाचे ३ नगरसेवक असे १० नगरसेवक नगर परिषदेच्या निवडणुकीत विजयी झाले होते. यानंतर झालेल्या स्वीकृत नगरसेवकपदाच्या निवडणुकीत या गटाचा आणखी एक उमेदवार निवडून आलेला होता.

Web Title:  10 municipal corporators of Pen Urban Development resign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.