पेण : एमएमआरडीएमध्ये संपूर्ण पेण तालुक्याचा समावेश झाल्याने पेणच्या विकासासाठी आगामी कालखंडात दहा हजार कोटींचे बजेट असलेली मूलभूत तथा विकासात्मक कामे सुरू होणार आहेत. पेण शहरातील माणूस सहज मुंबईशी संपर्कात येणार असून, नागरिकांचे जीवनमान उंचावणार आहे, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेणच्या सभेप्रसंगी केले. पेणमध्ये शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मुख्यमंत्र्यांनी विकासाच्या मुद्द्यावर जास्त भर दिला.ही लोकसभा निवडणूक भ्रष्टाचाराविरोधात असून, ‘सबका साथ सबका विकास’ हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे घोषवाक्य असल्याने देशातील जनता मोदींच्या प्रखर राष्टÑवादामागे उभी राहिलेली आहे. अनंत गीते हे स्वच्छ प्रामाणिक व निष्कलंक उमेदवार असल्याने त्यांना विजयी करा आणि विजयाचे ते शिवधनुष्य नरेंद्र मोदींच्या हातात द्या, मग बघा या भ्रष्टाचाराला पळता भुई थोडी होईल, असेही ते म्हणाले.गीते म्हणाले की, सहा वेळा रायगडच्या जनतेने माझ्यावर प्रेम केले आहे. सातव्यांदासुद्धा ही जनता माझ्या पाठीशी ठाम उभी राहिलेली आहे. त्यामुळे माझा विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. याप्रसंगी युतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री अनंत गीते, रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपचे रायगड जिल्हा संपर्कप्रमुख आ. प्रवीण दरेकर, माजी मंत्री रवि पाटील आदी उपस्थित होते.
'पेणच्या विकासासाठी दहा हजार कोटी देणार'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 6:01 AM