कर्जमाफी योजनेनुसार १० हजार पीक कर्ज
By admin | Published: July 17, 2017 01:26 AM2017-07-17T01:26:35+5:302017-07-17T01:26:35+5:30
शेतकरी कर्ज माफ करण्याकरिता ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७’ लागू करण्यात आली आहे. या योजनेनुसार
विशेष प्रतिनिधी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : शेतकरी कर्ज माफ करण्याकरिता ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७’ लागू करण्यात आली आहे. या योजनेनुसार ३० जून २०१६ रोजी जे शेतकरी सभासद थकबाकीदार आहेत अशा शेतकरी सभासदांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. मात्र यादरम्यान खरीप हंगामाची पेरणी सुरू झाली असून थकीत व कर्जमाफीस पात्र असलेल्या शेतकरी सभासदांना ते थकबाकीदार असल्यामुळे बँकांकडून कर्ज मिळू शकणार नाही. म्हणून अशा शेतकरी सभासदांना शासनाच्या कर्जमाफी योजनेनुसार चालू हंगामातील पेरणीसाठी आर्थिक मदत मिळावी याकरिता १० हजार रुपये इतके पीक कर्ज देण्यात येणार असल्याची माहिती रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक यांनी दिली आहे.
बँकेच्या केंद्रीय कार्यालयात शनिवारी झालेल्या मेळाव्यात नाईक बोलत होते. या व्यतिरिक्त ज्या शेतकरी सभासदांनी सन २०१५-१६ या वर्षात पीक कर्ज घेऊन त्याची मुदतीत परतफेड केली आहे, तसेच २०१६-१७ या वर्षात ज्या शेतकरी सभासदांनी पीक कर्ज घेतले आहे त्या शेतकरी सभासदांनी ३० जून पर्यंत मुदतीत परतफेड केली आहे,त्या शेतकऱ्यांना देखील या कर्जमाफी योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर रकमेचा लाभ मिळणार आहे. मात्र शासनाच्या नवीन परिपत्रकानुसार कर्ज परतफेडीचा कालावधी वाढवून तो ३० जूनऐवजी ३१ जुलै असा करण्यात आला आहे. त्यामुळे ज्या शेतकरी सभासदांना ३० जूनपर्यंत पीक कर्जाची परतफेड करता आली नव्हती अशा शेतकरी सभासदांना मुदतवाढ मिळाल्यामुळे कर्जाची परतफेड करता येणार असल्याचेही नाईक यांनी सांगितले.