रोहा : तालुक्यातील पश्चिम खोऱ्यात दहा वर्षांपूर्वी एमआयडीसीच्या माध्यमातून एमजीपीकडून पाणी योजना कार्यान्वित झाली. ही योजना सुरू झाल्यापासून एक वर्ष संबंधित गावांना पाणीपुरवठा सुरळीत झाला. मात्र, गेली नऊ वर्षे भातसई ते धोंडखार गावांत पाणी मिळत नसून ही गावे पाण्यापासून वंचित राहिली आहेत. यासंदर्भात या भागातील ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन येत्या आठ दिवसांत पाणी मिळावे, असे आवाहन केले आहे.
गेली नऊ वर्षे भातसई ते धोंडखार विभागात येणाऱ्या गावांना पिण्याचे पाणी मिळत नाही. यासंदर्भात अनेक वेळा प्रशासनाला पत्रव्यवहार करून दाखवून देण्यात आले व संबंधित अधिकाऱ्यांबरोबर बैठका घेण्यात आल्या; परंतु आजतागायत पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. निवडणुका आल्या की, १५ दिवसांत व महिन्यात पाणी मिळेल, असे तोंडी आश्वासन दिले जाते. त्यामुळे ग्रामस्थांची नेहमीच दिशाभूल होत आहे. कागदोपत्री या गावांना आम्ही लाखो लीटर पाणी पुरवत असल्याचे सांगत आहेत. मात्र, प्रत्यक्षात गावांना पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे पाण्याचा खूप मोठा गंभीर प्रश्न ग्रमास्थांसमोर उभा राहिला आहे. या भागातील महिला, वृद्ध महिला यांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
पाणीपुरवठा न होणारी गावेभातसई ते धोंडखारदरम्यान असलेली भातसई, लक्ष्मीनगर, झोलांबे, शेणवई, डोंगरी, वावे, वावे पोटगे, सानेगाव, यशवंतखार, धोंडखार ही १० गावे सतत पाण्यापासून वंचित आहेत. येथील ग्रमास्थांनी जिल्हाधिकारी रायगड तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, आमदार महेंद्र दळवी, उपविभागीय अधिकारी रोहा, तहसीलदार रोहा, उप अभियंता जीवन प्राधिकरण पेण, उप अभियंता एम.आय.डी.सी. धाटाव यांनाही प्रत्यक्ष भेट घेऊन व पत्र पाठवून निवेदन दिले आहे. या वेळी हेमंत देशमुख, सुधीर म्हात्रे, रामा शेरेकर, राजेश मोरे, आदेश देशमुख, राजन शिंदे, समीर सातपुते, संदीप देशमुख, महेश देशमुख, अरुण शिर्के, संभाजी निंबरे, पांडुरंग सानप आदी ग्रामस्थ उपस्थित होते.