रायगडला तातडीची १०० कोटींची मदत; मुख्यमंत्र्यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2020 06:47 AM2020-06-06T06:47:49+5:302020-06-06T06:48:08+5:30
चक्रीवादळामुळे रायगडला बसलेल्या तडाख्याची पाहणी करत त्यांनी नुकसानीचा आढावा घेतला. त्यानंतर नियोजन भवनातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांसाठी तातडीची १०० कोटींची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी केली. रायगड जिल्ह्यासह राज्यातील अन्य भागांचेही नुकसान झाले आहे. त्यांच्यासाठीही लवकरच आर्थिक मदत जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
चक्रीवादळामुळे रायगडला बसलेल्या तडाख्याची पाहणी करत त्यांनी नुकसानीचा आढावा घेतला. त्यानंतर नियोजन भवनातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पर्यावरण दिनीच पर्यावरणाची पडझड पाहिली. ‘निसर्ग’चे रौद्ररूप रायगडवासीयांनी थेट अनुभवले. मी पॅकेज जाहीर करणार नाही. पॅकेज हा घासून पुसलेला शब्द आहे, असा टोला लगावून ते म्हणाले, नुकसानीच्या पंचनाम्यांचे काम प्रशासनाने लगेचच सुरू केले आहे. त्याचा संपूर्ण तपशील मिळेपर्यंत किमान आठ दिवस लागतील. त्यानंतर किती आर्थिक मदत करायची, याचा निर्णय घेऊ. नुकसानीची ठोस आकडेवारी आल्यावरच केंद्राकडे मदत मागणार आहे. चक्रीवादळ येण्याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा झाली आहे. जीवितहानी होऊ न देणे हे प्रामुख्याने प्रशासनाचे काम असते. तरीही कोकणात सहा जणांचा मृत्यू झाला. विजेचा खांब अंगावर पडून मृत्युमुखी पडलेले अलिबागच्या उमटे गावातील दशरथ बाबू वाघमारे (५८) यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई म्हणून चार लाखांचा धनादेश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला.
बैठकीला पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख, आपत्ती व्यवस्थापन आणि मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, पालकमंत्री आदिती तटकरे, रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता पारधी, खासदार सुनील तटकरे, श्रीरंग बारणे, आमदार भरतशेठ गोगावले, रविशेठ पाटील, जयंत पाटील, बाळाराम पाटील, महेश बालदी, महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे, अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, विशेष पोलीस महानिरीक्षक राजकुमार व्हटकर, कोकण विभागीय आयुक्त लोकेश चंद्रा, जिल्हाधिकारी निधी चौधरी आदींसह विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.
असे वादळ सव्वाशे वर्षांनी...
रायगड आणि वादळ हे समीकरण जिल्ह्यासाठी अजिबात नवे नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडाला वादळे कशी पचवायची हे माहिती आहे. परंतु हे चक्रीवादळ सव्वाशे वर्षांनी आले आणि ते रायगडावर धडकले. सध्या वादळाचा धोका टळला असला तरी कोरोनाचे संकट अद्याप संपलेले नाही याची आठवण मुख्यमंत्र्यांनी करून दिली.
मुख्यमंत्र्यांचे आदेश
रोगराई पसरू नये, यासाठी तातडीने स्वच्छता करा. आपत्तीत ज्यांची घरे, गोठे, शेती, बागायतीची हानी झाली आहे, त्या उद्ध्वस्त झालेल्या नागरिकांची सोय करणार.
अशा वादळांमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी घरांची बांधणी कशी असावी याचे नियोजन करणार.
सर्वाधिक नुकसान विजेच्या खाबांचे. घरांचीही पडझड आणि झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या सर्व गोष्टी पुन्हा सुरळीत करण्यासाठी तांत्रिक मनुष्यबळ पुरविणार.
वादळामुळे ज्यांचा अन्नधान्याचा आणि जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे, तोही सोडविणार.
नुकसानीचे फोटो-व्हिडीओ पंचनाम्यावेळी ग्राह्य
पावसाळा तोंडावर असल्याने नुकसान झालेल्यांनी नुकसानीचे फोटो-व्हिडीओ काढून ठेवावेत. शारीरिक अंतर पाळत स्वच्छता करून घ्यावी. हे फोटो-व्हिडीओ पंचनाम्यात ग्राह्य धरण्यात येतील.