शिवमंदिरासाठी जागा देण्यास जेएनपीए राजी नसल्याने १०० कोटींच्या जासई उड्डाणपूलाच्या मार्गिकेचं काम रखडलं
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 05:56 PM2023-12-11T17:56:50+5:302023-12-11T18:01:27+5:30
जेएनपीए -नवी मुंबई दरम्यान प्रचंड प्रमाणात होणाऱ्या वाहतुकीमुळे दास्तानफाटा जासई ते गव्हाणफाटा दरम्यान दररोज वाहतूक कोंडी होत होती.
मधुकर ठाकूर
उरण : उरण, नवीमुंबई,जेएनपीए बंदराशी जोडणाऱा आणि वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा समजला जाणाऱ्या जासई उड्डाणपूलावरील दुसरी मार्गिका
वादात सापडली आहे.या मार्गिकेमध्ये येत असलेल्या शिवमंदिरासाठी ४० गुंठे जागे ऐवजी जेएनपीएने २५ गुंठे जागाच देऊ केली आहे.जासई ग्रामस्थ यासाठी
अद्यापही राजी नसल्याने मात्र जासई उड्डाणपुलाची दुसऱ्या मार्गिकेचे काम रखडले आहे.
जेएनपीए -नवी मुंबई दरम्यान प्रचंड प्रमाणात होणाऱ्या वाहतुकीमुळे दास्तानफाटा जासई ते गव्हाणफाटा दरम्यान दररोज वाहतूक कोंडी होत होती. या वाहतुकीचा वाढता ताण कमी करण्यासाठी दास्तानफाटा-जासई ते शिवमंदिर दरम्यान १२०० मीटर लांबीचा आणि सुमारे १०० कोटींहून अधिक खर्चाचा चौपदरी जासई उड्डाणपूल उभारण्यात येत आहे.शिवमंदिराच्या अडथळ्यामुळे या उड्डाणपूलाचे काम मागील आठ वर्षांपासून रखडत रखडत सुरू आहे.दरम्यान या जासई उड्डाणपूलावरील एका मार्गिकेचे काम पूर्ण झाले आहे. ही एक मार्गिका चार-पाच महिन्यांपूर्वी अभियंता दिनाचे औचित्य साधून गणपती सणाच्या अगोदरच वाहतूकीसाठी खुली करण्यात आली आहे.
ग्रामस्थ, ग्रामपंचायतीशी वारंवार झालेल्या बैठका, चर्चेनंतर जेएनपीएने शिवमंदिर दुसरीकडे हटवून मंदिर पुन्हा उभारण्यासाठी रांजणपाडा गावानजीक २५ गुंठे जमीन देण्याची तयारी दर्शवली आहे.मात्र जासई ग्रामस्थांना शिवमंदिरासाठी ४० गुंठे जागाच हवी आहे.शिव मंदिरासाठी ४० गुंठे जागा मिळावी याच मागणीवर ग्रामस्थ ठाम आहेत. ग्रामस्थांच्या मागणीवर अद्यापही जेएनपीए प्रशासनानेही कोणत्याही प्रकारचा तोडगा काढलेला नाही.यामुळे वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेल्या जासई उड्डाणपूलाच्या दुसऱ्या मार्गिकेचे काम रखडले असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपाध्यक्ष यशवंत घोटकर यांनी दिली.