अलिबाग – महिलांशी संबंधित गुन्ह्यांचा तपास अत्यंत शीघ्र गतीने व सामाजिक – मनोवैज्ञानिक संवेदना बाळगून केल्याबद्दल जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचे विशेष पोलिस महानिरीक्षक दिपक पांडे यांनी अभिनंदन केले आहे.
फौददारी कायदा अधिनियम (सुधारणा) २०१८ च्या कलम १७३ (१ अ) अंतर्गत बलात्काराच्या गुन्ह्याचा तपास गुन्ह्याच्या दाखल दिनांकापासून दोन महिन्याच्या आत पूर्ण होणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. पोलिसांपुढे कायद्याच्या चौकटीत न्यायालयातील खटल्यात त्रुटी राहू नये म्हणून बलात्कारासारख्या गुन्ह्यांचा तपास वेगाने करणे आव्हानात्मक असते. साक्षीदार फुटीचा प्रकार टाळणे, परीस्थितीजन्य पुराव्यांची योग्य मांडणी, वैद्यकीय अहवाल यावर गुन्हेगारांना शिक्षा होणे अवलंबून असते. घार्गे यांनी केवळ बलात्कारच नव्हे तर अन्य महिलांसबंधित गुन्ह्यांबाबत कडक धोरण अवलंबिले आहे. त्यांच्याकडे प्राप्त झालेल्या अशा तक्रारी ते तत्काळ संबंधितांकडे पाठवून पाठपुरावा घेतात व त्यात हयगय करणाऱ्यांची तमा ते बाळगीत नाहीत.
भारत सरकारच्या गृह विभागा अंतर्गत इन्व्हेस्टीगेशन ट्रॅकींग सिस्टीम फॉर सेक्शुअल ऑफेंडर्स ही प्रणाली वापरली जात आहे. पोलिस महासंचालक स्तरावर या प्रणालीचे सनियंत्रण करण्याची व्यवस्था केलेली आहे. एखादा गुन्हा घडला की त्याचा तपास कालबद्ध पद्धतीने होतो की नाही हे महासंचालक स्तरावरील वरीष्ठ पोलिस अधिकारी पाहतात.
विशेष पोलिस महानिरीक्षक ( महिला व बाल अपराध प्रतिबंध) दिपक पांडे यांनी रायगडचे पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचे महिलांशी संबंधित गुन्ह्यांचा तपास परीणामकारक पद्धतीने केल्याबद्दल अभिनंदन केले आहे. त्यांनी घार्गे यांना बलात्कारासारख्या गुन्ह्यांचा तपास दोन महिन्यांच्या आत पूर्ण करण्याचे का १०० टक्के पूर्ण केल्याबद्दल वाखाणले आहे.