पहिल्या टप्प्यात कोरोनाची लस घ्यायला डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांची १००% नोंदणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 11:38 PM2021-01-10T23:38:47+5:302021-01-10T23:39:10+5:30
प्रतिरोधासाठी लस आवश्यक : त्रास झाल्यास तत्काळ होणार औषधोपचार
पंकज राऊत
बोईसर : कोरोनाची लस सर्वात आधी डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे. अन्य अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांमध्ये काहीशी भीतीची भावना आहे. साईड इफेक्टच्या भीतीने दुसऱ्या टप्प्यात आपण लस घ्यावी अशी अनेकांची भावना आहे, मात्र पालघर जिल्ह्यामध्ये आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांनी लसीकरणासाठी १०० टक्के नोंदणी केली असून कर्मचाऱ्यांमध्ये किंचितही भीती नसल्याचे अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. पालघर जिल्ह्यात कोरोना लसीकरणासाठीची रंगीत तालीम (ड्राय रन) नुकतीच पार पडली असून जिल्ह्यातील एकूण १६ हजार कर्मचाऱ्यांना पहिल्या
टप्प्यात लसीकरण केले जाणार आहे. कुठलीही भीती न बाळगता ही लस घ्यायची असल्याचे आवाहन आरोग्य विभागाने आहे. लस घेतेवेळी एखाद्या व्यक्तीस त्रास झाल्यास तत्काळ त्यांच्यावर औषधोपचार करण्यात येणार आहेत. जिल्ह्याला ही लस प्राप्त होताच पहिल्या टप्प्यात आशा, आरोग्य व ग्रामीण रुग्णालयांच्या ११ हजार ९१३, खासगी शहरी व ग्रामीण भागातील ५ हजार ४९८ आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येईल. दुसऱ्या टप्प्यात पोलीस, ५० वर्षांवरील सर्व नागरिक व ५० वर्षांखालील रक्तदाब, मधुमेह, कर्करोग असणाऱ्या रुग्णांना लस देण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी डाॅ. माणिक गुरसळ तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी यांनीही कोरोना लसीकरण मोहिमेत समाविष्ट असलेल्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या आहेत.
लसीविषयी डाॅक्टर, कर्मचाऱ्यांमध्ये उत्सुकता
लसीकरणासंदर्भात आवश्यक बाबींची पूर्वतयारी तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना, नियमांचे पालन करून नुकतीच रंगीत तालीम घेतली गेली. या वेळी प्रत्यक्षात लस टोचली नसली तरी लस टोचण्यासाठी झालेली पूर्वतयारी याची पाहणी उपस्थित मान्यवरांनी केली. जिल्ह्यातील डाॅक्टर व कर्मचाऱ्यांमध्ये लसीची उत्सुकता आहे.
पालघर जिल्ह्यामध्ये कोरोना लसीकरणाची जय्यत तयारी झालेली आहे. जिल्ह्यातील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये कोरोना लसीविषयी किंचितही भीती नसून १०० टक्के कर्मचाऱ्यांनी नोंदणी केली आहे.
- डॉ. अनिल थोरात,
जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय, पालघर.
साथीच्या (संसर्गाच्या) सर्व आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी व्हॅक्सिलेशनची अत्यंत आवश्यकता आहे. आजाराच्या प्रतिरोधकासाठी प्रत्येकाने कोरोनाची लस घेणे गरजेचे असून आम्ही डॉक्टर मंडळी ही लस घेण्यास तयार आहोत.
- डॉ. शोभा संखे
अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन, बोईसर