जिल्ह्यातील १२६ शाळांचा १०० टक्के निकाल
By admin | Published: June 14, 2017 03:13 AM2017-06-14T03:13:02+5:302017-06-14T03:13:02+5:30
दहावीच्या निकालाबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेली उत्सुकता मंगळवारी संपली. दहावीच्या निकालावरून समाज माध्यमांवर
लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : दहावीच्या निकालाबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेली उत्सुकता मंगळवारी संपली. दहावीच्या निकालावरून समाज माध्यमांवर उसळलेल्या उलटसुलट चर्चेवर राज्य मंडळाने आॅनलाइन निकाल जाहीर करून अखेर पडदा टाकला. जिल्ह्याचा निकाल हा ८९.९३ टक्के लागला आहे. रायगड जिल्ह्यातील ५४४ शाळांपैकी १२६ शाळांचा निकाल हा १०० टक्के लागला आहे. अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी १८ जुलैपासून परीक्षा घेण्यात येणार आहे.
मार्च २०१७ मध्ये दहावीची परीक्षा पार पडली होती. जिल्ह्यातून तब्बल ३७ हजार ७८६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. जीवनाला दिशा देणाऱ्या या परीक्षेमध्ये मुलींनी उत्तुंग कामगिरी करत मुलांना मागे टाकले आहे. जिल्ह्यात विविध शैक्षणिक संस्थांच्या सुमारे ५४४ शाळा आहेत. पैकी १२६ शाळांचा निकाल हा १०० टक्के लागला आहे. या शाळेतील दहावीच्या परीक्षेला बसलेले सर्वच्या सर्व म्हणजे १०० टक्के विद्यार्थी पास झाले आहेत.
अनुत्तीर्ण होण्याचे प्रमाण हे केवळ १० टक्केच आहे. १४ जूनपासून विद्यार्थ्यांना गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रतींसाठी अर्ज करता येणार आहेत. याबाबतच्या अर्जाचा नमुना राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर आहे. जे विद्यार्थी नापास झाले आहेत त्यांच्यासाठी परीक्षा मंडळामार्फत पुन्हा १८ जुलै २०१७ पासून परीक्षा घेण्यात येणार आहे.