- वैभव गायकर
पनवेल : कर्नाळा पक्षी अभयारण्यात प्रथमच पक्ष्यांची स्वतंत्र गणना पार पडली. १९ ते २० डिसेंबर या दोन दिवसीय गणनेत निरीक्षकांना १०३ प्रजातींचे पक्षी या ठिकाणी आढळले. वन्यजीव विभाग ठाणे आणि ‘ग्रीन वर्क ट्रस्ट’ संस्थेने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या आणि पक्ष्यांचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध असलेल्या कर्नाळा पक्षी अभयारण्यात पहिल्यांदाच पक्षिगणना पार पडली. महत्त्वाचे म्हणजे शास्त्रीय पद्धतीने पक्षी मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या लाइन ट्रान्झॅक्ट आणि पॉइंट काउंट पद्धतीद्वारे ही गणना करण्यात आली. १९ ते २० डिसेंबर या दोन दिवसांच्या कालावधीत पार पडलेल्या पक्षिगणनेत एकूण २७ जण सहभागी झाले होते. यामध्ये वन विभागाच्या कर्मचाऱ्यांबरोबरच पक्षितज्ज्ञ, छायाचित्रकार, ई-बर्ड या संकेतस्थळाच्या वापरकर्त्यांचा समावेश होता. या पक्षिगणनेची सुरुवात राज्याचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, वन्यजीव (पश्चिम) सुनील लिमये यांच्या हस्ते झाली. या वेळी ठाण्याचे उपवनसंरक्षक (वन्यजीव) भानुदास पिंगळे, साहाय्यक वनसंरक्षक नंदकुमार कुप्ते, कर्नाळ्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण आणि ‘ग्रीन वर्क ट्रस्ट’चे निखिल भोपळे आदी उपस्थित होते.
या पक्ष्यांचा समावेश१०३ प्रजातींच्या पक्ष्यांमध्ये २० स्थलांतरित पक्ष्यांचा समावेश आहे. या पक्ष्यांमध्ये जंगल बबलर, ब्राऊन हेडेड बार्बेट, ग्रीन बी ईंटर, लिटल कार्मोरंट, इंडियन स्कोप वोल्व्ह, यलोव्ह काउंट वुडकीपर, इंडियन पित्ता, मलबार विस्टिंग थ्रश, कॉमन लॉरा, ब्लॅक ड्रॉगो, इंडियन ईगल, जंगल नाइटजर, ग्रेटर रॅकेट टेल्ड, ड्रोगो, हाउस क्रो, बुटेड ईगल आदींसह विविध पक्ष्यांचा समावेश आहे.
पक्षिगणनेसाठी तज्ज्ञ लोकांचे नऊ ग्रुप केले होते तयार कर्नाळा पक्षी अभयारण्यात एकूण ९ लाइन ट्रान्सिट तयार करण्यात आले होते. पक्षिगणनेत सहभागी झालेल्या तज्ज्ञ लोकांचे नऊ ग्रुप तयार करण्यात आले. यात प्रामुख्याने वनविभागाचे कर्मचारी व ग्रीन वर्क ट्रस्ट या संस्थेचा सदस्य यांचा समावेश होता. प्रत्येक लाइन ट्रान्झिट हे ५०० मीटर अंतराचे होते. अशा प्रत्येक ९ लाइन ट्रान्झिट परिसरामध्ये पक्षी निरीक्षण हे डाव्या-उजव्या तसेच समोरील बाजूस २० मीटरपर्यंत दिसणाऱ्या पक्ष्यांची नोंद करण्यात आली. पक्ष्यांच्या नोंदी या ई-बर्ड या ॲप्लिकेशनद्वारे जगभरात दिसून येणार आहे.