अद्यापही १०७ ग्रामस्थ बेपत्ता, २२ जणांचा मृत्यू; डोंगरानं पायथ्याचं गाव गिळलं

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2023 09:36 AM2023-07-22T09:36:35+5:302023-07-22T09:37:01+5:30

जिल्हाधिकारी; निर्वासितांचा मुक्काम वर्षभर कंटेनरमध्ये

107 villagers missing, 22 dead; The mountain swallowed the village at the foot in irshalwadi | अद्यापही १०७ ग्रामस्थ बेपत्ता, २२ जणांचा मृत्यू; डोंगरानं पायथ्याचं गाव गिळलं

अद्यापही १०७ ग्रामस्थ बेपत्ता, २२ जणांचा मृत्यू; डोंगरानं पायथ्याचं गाव गिळलं

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

अलिबाग : खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावातील ४६ घरांपैकी सतरा ते अठरा घरांवर दरड कोसळली आहे. या वाडीत २३१ नागरिक होते. दुर्घटनेत आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाला आहे. ६७ नागरिकांना निवारा केंद्रात ठेवले असून, १०७ जण बेपत्ता आहेत. ८ जखमींवर एमजीएम व शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. निर्वासितांची वर्षभर राहण्याची सोय कंटेनरमध्ये करण्यात येणार आहे

आतापर्यंत १०२ जणांचा शोध लागला आहे. इर्शाळवाडी गावातील नागरिकांसाठी तात्पुरती ३२ कंटेनर घरे सर्व सुविधांसह उपलब्ध करून देण्यात आली आहेत. निर्वासित झालेले आणि मृत कुटुंबांच्या वारसांसाठी चौक येथे जागा प्रस्तावित केली असून, शासनाकडे प्रस्ताव पाठविणार असल्याची माहिती रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

इर्शाळवाडी दरड दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने केलेल्या उपाययोजना, बचाव मोहीम, निर्वासित झालेल्या कुटुंबांची केलेली व्यवस्था आदींबाबत जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी माहिती दिली. इर्शाळवाडी गावातील १०२ जणांची आतापर्यंत ओळख पटलेली आहे. १०७ ग्रामस्थ बेपत्ता आहेत. काही जण नोकरी-व्यवसायानिमित्त बाहेर आहेत. काही नातेवाइकांकडे गेली आहेत. तसेच काही विद्यार्थी हे आश्रमशाळेत आहेत. त्यांचा शोध प्रशासनातर्फे घेतला जात आहे. ६७ जणांना शाळेत ठेवले आहे. त्यांच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था केली आहे. एक हजार जण मदतकार्य करीत असल्याची जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी माहिती दिली. 

कायमस्वरूपी वसाहतीसाठी जागा प्रस्तावित
चौक हद्दीतील सर्व्हे नंबर २७ ही शासकीय जागा इर्शाळवाडी ग्रामस्थांच्या कायमस्वरूपी वसाहतीसाठी प्रस्तावित करण्यात आलेली आहे. घरे बांधून देण्याबाबत सिडकोसोबत बोलणी शासन, प्रशासन स्तरावर केली जाणार आहेत. मदत व पुनर्वसन विभागामार्फत प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. 
    - डॉ. योगेश म्हसे, जिल्हाधिकारी, रायगड

औषध फवारणी
इर्शाळवाडीची दुर्घटना होऊन ३० तासांहून अधिक कालावधी लोटल्याने शुक्रवारी परिसरात दुर्गंधी सुटली. सध्या शोधमोहीम सुरू असल्याने हजारो जण याठिकाणी मदतकार्य करीत आहेत. दुर्गंधीमुळे रोगराई पसरू नये, यासाठी परिसरात आरोग्य विभागातर्फे औषध फवारणी करण्यात आली आहे.

अशी असेल व्यवस्था
n मुंबई-पुणे जुन्या महामार्गालगत असलेल्या जागेत ३२ कंटेनर घरांची वसाहत उभारली गेली आहे. वीज आणि पाण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. 
n कंटेनरमध्ये घरात लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू, कपडे, गृहोपयोगी वस्तूंसह सोयीयुक्त साहित्य भरून दिले जाणार आहे. तसेच २० शौचालय, २० स्वच्छतागृह सुविधाही उपलब्ध केली आहे. 
n शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आणि शालोपयोगी वस्तूंचा खर्च प्रशासनातर्फे केला जाणार आहे.

अधिकारी सतर्क असल्याने, यंत्रणा वेळेवर घटनास्थळी
हवामान विभागाने जिल्ह्याला मंगळवार, बुधवार दोन दिवस रेड अलर्ट जाहीर केला होता. कोणतीही नैसर्गिक आपत्ती ओढवली तर अधिकारी सतर्क असावेत, यासाठी बुधवारी सर्व अधिकाऱ्यांनी जागे राहण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. अधिकारी जागे राहावेत म्हणून रात्री अकरा आणि एक वाजता व्हीसी ठेवण्यात आली होती. त्यामुळे सर्व अधिकारी सतर्क होते. इर्शाळवाडी येथे दुर्घटना घडल्याचे कळल्यानंतर खालापूर प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते.

Web Title: 107 villagers missing, 22 dead; The mountain swallowed the village at the foot in irshalwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.