- मयूर तांबडेपनवेल : केवाळे येथील पुलाचे काम अपूर्ण असल्याने काही नागरिकांना जवळपास दहा किलोमीटरचा वळसा घेऊन प्रवास करावा लागत आहे. तर काही वाहने याच धोकादायक पुलावरून ये-जा करत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष व ठेकेदाराच्या वेळकाढू धोरणामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ठेकेदाराने बनवलेला कच्चा रस्ता पाण्यात वाहून गेला आहे.शांतिवन-भानघर रस्त्यामार्गे वाहने जाऊ लागल्याने या ठिकाणी वाहतूककोंडी होऊ लागली आहे. हा रस्ता एकेरी असल्याने एकाच वेळेस वाहने आल्याने वाहतुकीला अडथळे निर्माण होऊ लागले आहेत. तर दुसरीकडे आणखी एक महाळुंगी येथील पुलाचे काम अर्धवट स्थितीत आहे. महाळुंगीमार्गे नेरे, मोरबे परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात तळोजा एमआयडीसीमध्ये नोकरीसाठी जातात. मात्र, हा पूलदेखील अर्धवट असल्याने व नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी जात असल्याने त्यांना पनवेलमार्गे तळोजा गाठावे लागत आहे. शुक्रवार, २८ जून रोजी काहींनी चालत या पाण्यातून रस्ता काढत आपले घर गाठले. सुरक्षेसाठी या केवाळे व महाळुंगी पुलावर ठेकेदाराने कोणतीही काळजी घेतलेली दिसून येत नाही. नदीच्या खालच्या बाजूने जाण्यासाठी बांधलेला कच्चा रस्ता वाहून गेल्याने नागरिकांच्या अडचणीत वाढ झालेली आहे.बससेवा बंदकेवाळे रस्ता बंद झाल्यामुळे येथून मोरबेकडे जाणारी बससेवा बंद करण्यात आलेली आहे. मोरबे येथे सकाळी व संध्याकाळी आशा दोन वेळा बस सोडण्यात येत होती. त्यामुळे या बसमध्ये आदिवासी बांधवांची संख्या मोठी होती. बस बंद केल्यामुळे प्रवाशांना मिळेल ते वाहन पकडून घर गाठावे लागत आहे.ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणीगेल्या तीन महिन्यांपासून केवाळे पुलाचे काम सुरू आहे. मात्र, ते पूर्ण करण्यात आलेले नाही. संथगतीने काम सुरू असल्याने त्याचा मनस्ताप नागरिकांना व वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. अर्धवट पुलाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करून त्याला काळ्या यादीत टाकण्याची मागणी प्रवासी करू लागले आहेत.
रस्ता वाहून गेल्याने १० कि.मी.चा वळसा; नागरिकांना वर्दळ करताना अडचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 12:50 AM