दहावीमध्ये यंदाही मुलीच ठरल्या हुशार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 11:47 PM2020-07-29T23:47:11+5:302020-07-29T23:47:32+5:30

रायगडमध्ये दहावीचा निकाल ९६.७ टक्के : गेल्या वर्षीच्या तुलनेत पास होण्याचा आलेख १९.२९ टक्क्यांनी उंचावला

In the 10th, only the girls became smart again | दहावीमध्ये यंदाही मुलीच ठरल्या हुशार

दहावीमध्ये यंदाही मुलीच ठरल्या हुशार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
रायगड : जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९६.७ टक्के लागला आहे. यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. ९७.३३ टक्के मुली तर ९४.२१ टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दहावीचा निकाल तब्बल १९.२९ टक्क्यांनी वाढला आहे. महाड आणि पनवेल तालुक्यातील प्रत्येकी ९७.२८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने, ते तालुक्यात पहिल्या क्रमांकावर राहिले आहेत. सर्वाधिक ९३.०४ टक्के कमी निकाल हा खालापूर तालुक्याचा लागला आहे. आॅनलाइन निकाल कळताच विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला.
राज्य शिक्षण मंडळाने मार्च महिन्यात घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी २९ जुलै रोजी आॅनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी निकालातील बाजी मारली आहे. राज्यात सर्वाधिक ९८.७७ टक्के निकाल कोकण विभागाचा लागला आहे, तर सर्वात कमी ९२ टक्के निकाल औरंगाबाद विभागाचा लागला आहे. हा निकाल वाढण्यामागचे नेमके कारण समोर आले आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी काही परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या, तर काही ठिकाणी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द करण्यात आला होता. विद्यार्थ्यांना त्या विषयाचे सरासरी गुण देण्यात आले आहेत, तसेच अंतर्गत मूल्यमापन, कृतिपत्रिका आणि भूगोलाचे सरासरी गुणांमुळे या वर्षी निकालाचे प्रमाण वाढले आहे, अशी माहिती रायगड जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी प्रकाश खोपकर यांनी ‘लोकमत’ला दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे दहावीच्या उत्तरपत्रिका तपासणीच्या, तसेच विभागीय मंडळाकडे जमा करण्याच्या प्रक्रियेत अनेक अडचणी आल्या होत्या. मात्र, कोरोनाच्या कालावधीतही मंडळाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आणि शिक्षकांनी निकाल तयार करण्याचे काम सुरूच ठेवले होते. यामुळे २९ जुलै रोजी दहावीचा निकाल जाहीर करणे शक्य झाले आहे.
अलिबाग तालुक्याचा ९६.०५ टक्के निकाल लागला आहे. ४३ शाळेतून २८०८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी २६९७ विद्यार्थी पास झाले आहेत. त्यामध्ये मुलं पास होण्याचे प्रमाण हे ९४.८८ टक्के तर मुलींचे प्रमाण हे ९७.३९ टक्के आहे.

प्रणवीला मिळाले १०० टक्के
अलिबाग : बुधवारी इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये अलिबाग शहरातील कुरुळ येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या आर.सी.एफ शाळेतील प्रणवी बसंत सिंह हिने १०० टक्के गुण प्राप्त केले आहेत. प्रणवी हिने मिळविलेल्या घवघवित यशाचे शाळेच्या वतीने कौतूक करण्यात येत आहे. यातील विशेष बाब म्हणजे निकाल १०० टक्के लागला आहे.

३३ हजार ७७८ विद्यार्थी उत्तीर्ण
1मागील वर्षी मार्च, २०१९ मध्ये ८०:२० पॅटर्न रद्द करून, सर्व विषयांची १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात आली. त्यामुळे निकालाची टक्केवारी चांगलीच घसरली होती,
2परंतु राज्य सरकारच्या आदेशानुसार, राज्य मंडळाने मार्च, २०२० मध्ये पुन्हा ८० गुणांची लेखी आणि २० गुणांची तोंडी परीक्षा घेतल्यामुळे यंदा निकालात १९.२९ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
3रायगड जिल्ह्यात ५५१ शाळांतील ३५ हजार ३२६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. पैकी ३५ हजार १६० विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली होती. त्यातील ३३ हजार ७७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाची टक्केवारी ९६.७ टक्के आहे.

Web Title: In the 10th, only the girls became smart again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.