११० वर्षांच्या गंगूबाईंचा मतदान केंद्रावर होणार सत्कार; निवडणूक आयोगाचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 01:07 AM2019-04-23T01:07:10+5:302019-04-23T06:38:20+5:30
लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीपासून मतदान करणाऱ्या ज्येष्ठ मतदार
अलिबाग : देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सर्वप्रथम १९५२ मध्ये झालेल्या लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीपासून आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावत असलेल्या महाड तालुक्यातील आमशेत या छोट्या गावातील ११० वर्षांच्या वयोवृद्ध गंगूबाई चव्हाण या यंदाच्या १७ व्या लोकसभा निवडणुकीत देखील मंगळवार, २३ एप्रिल रोजी मतदान करणार आहेत. थेट गंगुबाई चव्हाण यांची मुलाखत रविवारी ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यावर, त्याची तत्काळ दखल रायगड लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी घेवून, भारत निवडणूक आयोगाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्याचा निर्णय घेतला आहे.
मंगळवारी २३ एप्रिल रोजी महाड तालुक्यातील आमशेत मतदान केंद्रावर भारत निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी तथा महाड विधानसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल इनामदार यांच्या हस्ते गंगूबाई चव्हाण यांचा सत्कार करण्यात येणार आहे. दरम्यान, ११० वर्षांच्या ज्येष्ठ मतदार गंगूबाई चव्हाण यांना निवडणूक यंत्रणेच्या वाहनाने त्यांच्या कुटुंबीयांसह सन्मानाने आमशेत मतदान केंद्रावर आणण्यात येईल. त्यांचे मतदान झाल्यावर त्याच ठिकाणी त्यांचा हा यथोचित सत्कार सोहळा संपन्न होणार आहे. त्यानंतर पुन्हा निवडणूक यंत्रणेच्या वाहनाने त्यांना त्यांच्या कुटुंबीयांसह त्यांच्या घरी पोच करण्यात येईल, अशी माहिती महाड विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल इनामदार यांनी दिली आहे.