APMC कंपनीतील विविध ठेकेदार कंपन्यांमध्ये वेतन वाढीच्या करारामुळे कामगारांना ११००० पर्यंत लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2023 07:16 PM2023-07-31T19:16:06+5:302023-07-31T19:16:20+5:30
दत्ता सामंत प्रणित महाराष्ट्र जनरल कामगार संघटना आणि व्यवस्थापन यांच्यातील २०२३ ते २०२५ या तीन वर्षांसाठी झालेल्या करारामुळे कामगारांना टप्प्याटप्प्याने ११ हजारांपर्यंत वेतनवाढीचा लाभ मिळणार आहे.
मधुकर ठाकूर
उरण: येथील एपीएमसी कंपनीतील विविध ठेकेदार कंपन्यांमध्ये कंत्राटी पद्धतीवर काम करणारे २०० कामगारांच्या वेतन वाढीच्या करारावर सोमवारी (३१) स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. दत्ता सामंत प्रणित महाराष्ट्र जनरल कामगार संघटना आणि व्यवस्थापन यांच्यातील २०२३ ते २०२५ या तीन वर्षांसाठी झालेल्या करारामुळे कामगारांना टप्प्याटप्प्याने ११ हजारांपर्यंत वेतनवाढीचा लाभ मिळणार आहे.
येथील एपीएमसी (ओल्ड मर्स्कस) कंपनीत फ्युचर टफिंग,सोल्युशन,पिनाकल ,सेव्हन स्टार , सेक्युरिटी ॲण्ड फाईव्ह स्टार आदी कंपन्या ठेकेदारी पध्दतीवर काम करीत आहेत.या ठेकेदार कंपन्यांमध्ये ऑपरेटर, सव्हेअर आणि लेबर असे मिळून सुमारे २०० कामगार काम करीत आहेत.कामगारांना वेतनवाढीच्या बरोबरच विमा,बोनस आणि आवश्यक सोयीसुविधा आणखी लाभ मिळावा यासाठी दत्ता सामंत प्रणित महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष भुषण सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली येथील युनिटच्या पदाधिकाऱ्यांचा व्यवस्थापनाकडे पाठपुरावा सुरू होता.संघटनेने सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर व्यवस्थापनाने वेतनवाढीचा करार करण्यासाठी तयारी दर्शवली होती.
अखेरीस सोमवारी (३१) दत्ता सामंत प्रणित महाराष्ट्र जनरल कामगार संघटना आणि एपीएमसी व्यवस्थापन यांच्यात वेतनवाढीचा करार संपन्न झाला. वेतनवाढीच्या कराराप्रसंगी एपीएमसीच्या ऑल इंडिया युनिटचे इन्चार्ज चिराग जगड,आयआर योगेश ठाकूर, विविध ठेकेदार कंपन्यांचे संतोष कुमार, शेखर तांडेल तर महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष भुषण सामंत, उपाध्यक्ष रोशन ठाकूर, जनरल सेक्रेटरी वर्गीस चाको आदी उपस्थित होते.
व्यवस्थापन आणि संघटनेत सोमवारी (३१) पुढील तीन वर्षांसाठी झालेल्या वेतन वाढीच्या करारानुसार
पहिल्या टप्प्यात ५० टक्के, दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात कामगारांना २५-२५ टक्के वेतनवाढीचा लाभ मिळणार आहे.या वेतनवाढीच्या करारामुळे ऑपरेटर - ११०००, सर्व्हेअर--९००० आणि लेबर- ८००० रुपयांची वेतनवाढ मिळणार आहे.तसेच तीन लाखांचा विमा संरक्षण,बोनस आणि इतर आवश्यक सोयी सुविधांबरोबरच कॅन्टीन फॅसिलिटीमध्ये ९० टक्के सबसिडीचा लाभ मिळणार असल्याची माहिती संघटनेचे उपाध्यक्ष रोशन ठाकूर यांनी दिली. तीन वर्षांच्या वेतन वाढीच्या करारामुळे कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.