महसूलचे ११३ कर्मचारी बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 12:21 AM2020-09-22T00:21:40+5:302020-09-22T00:21:46+5:30
८३ जण उपचारानंतर झाले बरे : रायगडमध्ये प्रादुर्भाव वाढत असला, तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक
निखिल म्हात्रे।
लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, सरकारी कार्यालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने बाधित होत आहेत. महसूल खात्यात आजपर्यंत ११३ रुग्ण आढळले असून, ८६ जण उपचारानंतर बरे झाले आहेत. २६ जण सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत, तर एका नायब तहसीलदारांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असला, तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही अधिक आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रहिवासी क्षेत्रातील नागरिकांसह डॉक्टर, नर्स, पोलीस कर्मचारी सफाई कामगार व इतर कोरोना योद्ध्यांनाही कोरोना विषाणूची लागण झाली, परंतु कोरोनाने आपला मोर्चा शासकीय कार्यालयांकडे वळविला असून, शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी कोरोना विषाणूच्या दुष्ट चक्रात सापडत आहेत. कोरोना संसर्ग व त्याच्या साखळी तोडण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्याची बाधा होत असल्याने आता संसर्गाचा धोका वाढत चालला आहे.
लॉकडाऊन कालावधीत नागरिकांची कामे कामे ताटकळत न राहण्यासाठी, तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आरोग्य व पोलीस यंत्रणेसह महसूल विभाग अहोरात्र मेहनत घेत होता. अडकलेल्या नागरिकांना स्थलांतर करण्याचे कामही महसूल विभागाने जवळून केल्याने त्यांना संसर्गाला सामोरे जावे लागले आहे. आणखीही महसूलचे कर्मचारी नागरिकांच्या सेवेत आहेत.
नागरिकांबरोबर शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी स्वत:ची काळजी घेण अत्यावश्यक आहे. कार्यालयात सोशल डिस्टंन्सचे पालन करून काम करणे गरजेचे आहे. कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांची घेण्यासाठी स्वॅब टेस्ट, अॅन्टिजन टेस्ट घेण्यात आल्या आहेत, तसेच प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी सी-व्हिटॅमिन टॅबलेट, मास्क व सॅनिटायजरही पुरविण्यात आले.
- निधी चौधरी, जिल्हाधिकारी, रायगड
नागरिकांनाचा निष्काळजीपणा घातक : महसूल अधिकारी व कर्मचाºयांमध्ये कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण अधिक असले, तरी बरे होण़्याचे प्रमाणही वाढले आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी त्याची साखळी तोडण्यासाठी आरोग्य प्रशासनासह जिल्हा प्रशासन अहोरात्र मेहनत करीत आहे. मात्र, नागरिकांनाचा निष्काळजीपणा घातक ठरत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेऊनच काम करणे अत्यावश्यक आहे.
नायब तहसीलदारांचा मृत्यू
रायगड जिल्ह्यात आतापर्यंत २ प्रांताधिकारी, १ तहसीलदार, ४ नायब तहसीलदार, २८ तलाठी, १ लघू लेखक, २८ लिपिक, १६ अव्वल कारकून, ४ चालक, १४ शिपाई, ६ मंडळ अधिकारी, ६ कोतवाल, २ सफाई कामगार असे एकूण ११३ रुग्ण आढळले असून, ८६ जण उपचारानंतर बरे झाले आहेत. २६ जण सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत, तर १ नायब तहसीलदारांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.