देशव्यापी संपात रायगड जिल्ह्यातील 1150 रेशनिंग दुकानदार सहभागी
By निखिल म्हात्रे | Published: January 1, 2024 09:29 PM2024-01-01T21:29:02+5:302024-01-01T21:29:42+5:30
अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसीन परवानाधारक महासंघाने सोमवारपासून (1 जानेवारी) आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत बंद पुकारला आहे.
अलिबाग - रास्तभाव धान्य दुकानदार व किरकोळ केरोसीन परवानाधारकांनी आजपासून (1 जानेवारी) देशव्यापी बेमुदत संप पुकारला आहे. या संपात सर्व रेशनिंग दुकानदार सहभागी होणार असल्याचा दावा संघटनांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे वर्षाच्या पहिल्याच दिवशी रेशनिंग दुकाने बंद राहणार असल्याने नागरिकांना धान्य मिळणार नाही. सोमवारपासून रायगड जिल्हयातील सर्व 1 हजार 150 दुकाने बंद राहणार असल्याची माहिती रायगड जिल्हा रास्तभाव धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रमोद घोसाळकर यांनी दिली.
अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसीन परवानाधारक महासंघाने सोमवारपासून (1 जानेवारी) आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत बंद पुकारला आहे. देशपातळीवरही ऑल इंडिया फेअर प्राइस शॉप डिलर्स फेडरेशनने अशाच पद्धतीने बेमुदत बंद पुकारला आहे. राज्यात सुमारे 53 हजार रेशन दुकानदार आहेत. त्यांच्या प्रलंबित न्याय हक्क मागण्यांसंदर्भात केंद्र आणि राज्य सरकार उदासीन आहे. यापूर्वीच्या आंदोलन आणि मोर्चाची सरकारकडून दखल घेतली नाही. त्यानंतर राज्य सरकारने हिवाळी अधिवेशन काळात महासंघाच्या निवेदनाची दखल घेत नागपूरला सचिवांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात केवळ आश्वासन देण्यात आले. मात्र, निर्णय झाला नाही. त्यामुळे महासंघाच्यावतीने एक जानेवारीपासून ऑल इंडिया फेअर प्राइस शॉप डीलर्स फेडरेशनने पुकारलेल्या संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनात राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी सहभागी होण्याचे आवाहन महासंघाकडून करण्यात आले आहे. बंदच्या काळात दुकानदारांनी आपापल्या दुकानातील ई-पॉस मशीन कार्यान्वित करू नयेत. तसेच, कोणत्याही प्रकारे धान्याची उचल आणि वितरण करू नये, असे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे.
रायगड जिल्ह्यात 1 हजार 150 रेशनिंग दुकाने आहेत. ही सर्व दुकाने संपात सहभागी होणार असून बंद राहणार आहेत. रेशनिंग दुकानदारांच्या मागण्या मान्य होईपर्यंत हा संप सुरु राहणार आहे. 16 तारखेला रेशनिंग दुकानदारांतर्फे दिल्लीत मोर्चा काढण्यात येणार आहेत, त्यातही रायगड जिल्ह्यातील दुकानदार सहभागी होतील, अशी माहिती रायगड जिल्हा रास्तभाव धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष प्रमोद घोसाळकर यांनी दिली.
अलिबाग तालुका रेशनिंग दुकानदार संघटनेचे अध्यक्ष महेंद्र पाटील यांनी सांगितले की, अलिबाग तालुक्यात 82 रेशनिंग दुकाने आहेत, ती सर्व संपामुळे बंद राहणार आहेत. रेशनिंग दुकानदारांच्या मागण्यांबाबत शासनाकडे संघटनांनी पाठपुरावा केलेला आहे. शासन फक्त आश्वासन देत आहे. कार्यवाही करीत नाही. प्रति क्विंटलचे मार्जिन 150 वरून 300 रुपये करावे यासह इतर मागण्या आहेत. तसेच सहा-सहा महिने दुकानदारांना मार्जिन मिळत नाही. त्यामुळे नोकरांचे पगार, भाडे, लाईट बील हा खर्च कर्ज काढून करावा लागतो. महिन्याचे मार्जिन त्याच महिन्यात मिळाले पाहिजे. रेशनिंग दुकानदारांच्या या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी 1 जानेवारीपासून बेदमुत संप पुकारल्याचे महेंद्र पाटील यांनी सांगितले. या संपावर शासनाकडून तोडगा न निघाल्यास सोमवारी वर्षाच्या पहिल्याच दिवशी रेशनिंग दुकाने बंद राहणार असून गोरगरीबांना धान्य मिळणार नाही.