पेणमधील ११६ गावे चकाचक
By Admin | Published: January 25, 2016 01:24 AM2016-01-25T01:24:39+5:302016-01-25T01:24:39+5:30
भारत स्वच्छ अभियानाच्या धर्तीवर महाराष्ट्र स्वच्छ अभियानाअंतर्गत श्री सदस्यांच्या डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे स्वच्छता मोहिमेचा
पेण : भारत स्वच्छ अभियानाच्या धर्तीवर महाराष्ट्र स्वच्छ अभियानाअंतर्गत श्री सदस्यांच्या डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे स्वच्छता मोहिमेचा दुसरा टप्पा रविवारी पार पडला. पेणच्या २७ ग्रामपंचायतीच्या कार्यकक्षेतील ११६ गावे व वाड्यांवर पहाटे ६ वाजल्यापासून श्री सदस्यांनी हातात स्वच्छतेसंबंधीची अवजारे, झाडू, विळे व प्लास्टिक गोणी घेऊन गावे स्वच्छ करण्यास सुरुवात केली. गटागटाने एकवटून गावच्या वेशी, परिसर, मंदिराचे आवार, मुख्य रस्ते, शाळा, ग्रामपंचायत कार्यालयीन परिसर झाडून, कचरा गोळा करून प्रतिष्ठानने दिलेली जबाबदारी पार पाडत तब्बल पाच तास स्वच्छता केली.
२६ जानेवारीच्या ध्वजारोहणाप्रसंगी जो कचरा व जी स्वच्छता ग्रामपंचायतींना करावी लागत होती, ते महत्त्वपूर्ण काम पेणमध्ये तीन हजार श्री सदस्यांनी केले. स्वच्छता अभियान हा राष्ट्रीय कार्यक्रम असल्याने राष्ट्रहिताची भावना व जबाबदार नागरिकांचे कर्तव्य पार पाडून श्री सदस्यांनी गावोगावचे कचऱ्याची ढीग दूर करून ते जाळण्यात आले.
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा हा उपक्रम यापूर्वी नगरपालिका व महानगरपालिका क्षेत्रात राबविला होता. त्यामुळे नगरच्या कार्यकक्षेत श्री सदस्यांची मोहीम दृष्टिपथात होती. दुसऱ्या टप्प्यातील हा उपक्रम ग्रामपंचायती व महसुली गावांच्या हद्दीत असल्याने दूरदूरच्या अंतरावरील कार्यक्षेत्र असल्याने श्री सदस्यांच्या बैठकांच्या सदस्यांना आपल्या जवळील गावाची स्वच्छता करण्याचे नीटनिटके नियोजन व वेळापत्रक दिल्याने पहाटे ५ वाजता श्री सदस्यांनी आपापले साहित्य घेऊनच घराबाहेर पडले. दिलेल्या ठिकाणावर वेळेअगोदर पोहोचून परमेश्वराचे नामस्मरण व मनाचे श्लोक उच्चारत अनेक सदस्य गावागावात स्वच्छता करीत होते. (वार्ताहर)