अलिबाग : पोलीस दलातील उत्कृष्ट कामगिरी करणारे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह व आंतरिक सुरक्षा पदके महाराष्ट्र दिनी प्रदान करून सन्मानित करण्याची परंपरा महाराष्ट्र पोलीसची आहे. यंदा या सन्मानास पात्र ठरलेल्या रायगड पोलीस दलातील १२ बहाद्दर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना ही पदके रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांच्या हस्ते प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्र पोलीस दलाच्या सेवेत सलग १५ वर्षे उत्तम सेवाभिलेख ठेवल्याबद्दल रायगड पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाºयांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह २०१९ तसेच आंतरिक सुरक्षा पदक व विशेष सेवा पदक अशा पदकांचा यात समावेश आहे. खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजीत जगन्नाथ पाटील यांनी जून २०१६ ते ऑगस्ट २०१८ या कालवधीत गडचिरोली या नक्षलवादी जिल्ह्यात धोणोरा येथे उत्तम कामगिरी केली असून, त्याकरिता त्यांना विशेष सेवा पदक देऊन गौरविण्यात आले.
पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनाजी बाबुराव क्षीरसागर पोलीस दलात १९९० मध्ये पोलीस उप निरीक्षक या पदावर भरती झाले असून, सेवा कालावधीत त्यांना २६५ बक्षिसे मिळाले. त्यांनी विविध क्लिष्ट स्वरूपाचे गुन्हे तपासले असून आरोपींना शिक्षा झालेली आहे, तसेच दरोडा टाकणाºया टोळीस जीवाची बाजी लावून पकडून वेळीच गुन्ह्यांना पायबंद घातला आहे. त्यांच्या उत्तम सेवा कालावधीकरिता त्यांना पोलीस महासंचालक पदक प्रदान करून गौरविण्यात आले आहे.
रायगड जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश हरिभाऊ वराडे हे पोलीस दलात १९९१ साली पोलीस उप निरीक्षक या पदावर भरती झाले. आजपर्यंतच्या सेवा कालावधीत त्यांना १११ बक्षिसे मिळाली असून, सेवा कालावधीत त्यांनी विविध क्लिष्ट स्वरूपाचे गुन्हे तपासले असून आरोपींना शिक्षा झालेली आहे. त्यांच्या उत्तम सेवा कालावधीकरिता त्यांना पोलीस महासंचालक पदक देऊन गौरविण्यात आले.
कर्जत पोलीस ठाण्यांतील पोलीस उप निरीक्षक सचिन मोहन गावडे यांनी ऑगस्ट २०१४ ते सप्टेंबर २०१७ या कालावधीत गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागामध्ये चामोशी पोलीस ठाण्यात चांगली कामगिरी करून नक्षलग्रस्त भागामध्ये खडतर सेवा पूर्ण केल्याबद्दल त्यांना विशेष सेवा पदक देऊन गौरविण्यात आले आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पोलीस उप निरीक्षक अमोल गडयाप्पा वळसंग यांनी १६ ऑगस्ट २०१४ ते २१ सप्टेंबर २०१७ या कलावधीत गडचिरोली जिल्ह्यात धानोरा नक्षलग्रस्त भागामध्ये खडतर सेवा पूर्ण केल्याबद्दल त्यांना विशेष सेवा पदक देऊन गौरविण्यात आले आहे.
रायगड पोलीस दलातील राखीव पोलीस उप निरीक्षक अजय विनायक शेवाळे हे नागपूर ग्रामीण जिल्हा पोलीस दलांत पोलीस शिपाई पदावर २६ जुलै १९८८ रोजी भारती झालेले असून २९ एप्रिल २०१६ रोजी त्यांनी नागपूर व रायगड जिल्ह्यात प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडले असून, सध्या ते पोलीस मुख्यालय,अलिबाग येथे राखीव पोलीस उप निरीक्षक पदावर कार्यरत आहेत. त्यांना आतापर्यंतच्या सेवाकाळात १०३ बक्षिसांनी गौरविण्यात आले आहे. या त्यांच्या उत्तम कामगिरीबद्दल त्यांना पोलीस महासंचालक पदक प्रदान करून गौरविण्यात आले.
सहायक फौजदार सुधीर मार्तंड शिंदे हे ९ ऑक्टोबर १९८९ रोजी रायगड पोलीस दलात दाखल झाले. रायगड पोलीस मुख्यालय, महाड शहर, माथेरान, रसायनी, खालापूर पोलीस ठाणे येथे चांगली कामगिरी पार पाडलेली असून, सध्या ते अलिबाग पोलीस ठाणे येथे नेमणुकीस आहेत. त्यांनी त्यांच्या ३० वर्षांच्या सेवाकालावधीत १०१ बक्षिसे मिळवलेली आहेत. त्यांचा पोलीस महासंचालक पदक देऊन गौरविण्यात आले.
सहायक फौजदार हर्षकांत काशिनाथ पवार हे १९९२ साली रायगड जिल्हा पोलीस दलात शिपाई म्हणून भरती झाले आहेत. त्यांनी रायगड जिल्ह्यात पोलीस मुख्यालय अलिबाग, वडखळ, पेण, मुरुड, रोहा व अलिबाग उप-विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येथे काम केले असून, ते सध्या रायगड अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या लघुलेखक कार्यालयात कार्यरत आहेत. आतापर्यंतच्या सेवाकाळात त्यांना १११ बक्षिसे मिळाली आहेत. त्यांच्या या उत्तम कामगिरीबद्दल त्यांना पोलीस महासंचालक पदक देऊन गौरविण्यात आले आहे.
पोलीस हवालदार बाबासाहेब तुकाराम लाड हे १९९७ साली राज्य राखीव पोलीस बल गट क्रं माक पाच दौंड पुणे येथे शिपाई म्हणून भरती झाले असून, सन २०१२ मध्ये ते रायगड जिल्हा पोलीस दलात बदलून आले. उत्तम कवायत निर्देशक असणारे लाड हे कंपनी ड्रिलमध्ये पारंगत आहेत. आतापर्यंत सेवाकाळात त्यांना १२३ बक्षिसे मिळाली आहेत. त्यांच्या या उत्तम कामगिरीबद्दल त्यांना पोलीस महासंचालक पदक देऊन गौरविण्यात आले. पोलीस नाईक बिपीन जगदीश थळे हे सन २००५ साली रायगड जिल्हा पोलीस दलात शिपाई म्हणून भरती झाले. त्यांनी रायगड जिल्ह्यात पोलीस मुख्यालय अलिबाग रसायनी व पेण पोलीस ठाणे येथे काम केले असून, सध्या ते खोपोली पोलीस ठाणे येथे काम करीत आहेत. त्यांचा आतापर्यंत सेवाकाल उत्तम असून ते उत्तम कबड्डी खेळाडू असून ६६ व्या अखिल भारतीय पोलीस रेसलिंग क्लस्टर स्पर्धा २०१७ या सांघिक कबड्डी स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. त्यांच्या या उत्तम कामगिरीबद्दल त्यांना पोलीस महासंचालक पदक प्रदान करून गौरविण्यात आले.