नारळ-सुपारी बागायतदारांना १२ कोटींचे पॅकेज मंजूर; १,५७६ हेक्टरवरील १७ लाख झाडांसाठी मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 12:12 AM2020-07-25T00:12:47+5:302020-07-25T00:12:59+5:30
१६ लाख ८६ हजार ७६१ झाडांचे झाले नुकसान
- आविष्कार देसाई
रायगड : निसर्ग वादळातील बागायतदारांना नुकसान भरपाई देण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. जिल्ह्यात एक हजार ५७६.४९ हेक्टर क्षेत्रावरील एकूण १६ लाख ८६ हजार ७६१ नारळ आणि सुपारींच्या झाडांचे नुकसान झाले होते. सरकारच्या निर्णयामुळे नुकसान भरपाईपोटी ११ कोटी ९३ लाख १६ हजार २५० रुपये मिळण्यातील अडचण आता दूर झाली आहे. मात्र, मदत तुटपुंजी असल्याचे बागायतदारांचे म्हणणे असल्याने त्यांच्यामध्ये नाराजीचा सूर आहे.
३ जूनला झालेल्या निसर्ग चक्रीवादळाने रायगड जिल्ह्यासह रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात चांगलाचा हाहाकार उडवला होता. निसर्ग चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका हा रायगड जिल्ह्याला बसला होता. जिल्ह्यातील घराचे, गोठ्यांचे, विजेचे पोल, विजेच्या तारा, आंबा, काजू, कोकम यांच्यासह नारळ आणि सुपारींच्या बागांचे आतोनात नुकसान झाले होते. पुढील १५ वर्षांचे बागायतदारांचे आर्थिक नुकसान झाल्याने, प्रति झाड नुकसान भरपाई मिळणे गरजेचे होते.
सुरुवातीला नारळ आणि सुपारी हे घटक नुकसान भरपाईच्या कक्षेत येत नसल्याने खासदार सुनील तटकरे आणि पालकमंत्री आदिती तटकरे यांनी सरकारला नव्याने आदेश पारीत करायला भाग पाडले. नारळ आणि सुपारीला नुकसान भरपाई देण्याला संमती मिळाली. मात्र, नारळासाठी प्रति झाड १२७ रुपये तर सुपारीसाठी ११ रुपये मिळणार होते.
सरकारकडून देण्यात येणारी मदत अतिशय तुटपुंजी असल्याने ती वाढवून घेण्यात पुन्हा पालकमंत्री आदिती तटकरे यांना यश आले. आता नवीन नियमानुसार प्रति नारळाच्या झाडाला २५० रुपये, तर प्रत्येक नुकसान झालेल्या सुपारीच्या झाडासाठी ५० रुपये देण्याला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे बागायतदारांना आर्थिक मदत मिळण्यातील मोठी अडचण दूर झाली आहे.
नारळ आणि सुपारीसाठी प्रत्येक झाडामागे मदत मिळण्याची आमची मागणी होती. ती सरकारने मान्य केल्याने आता बागायतदारांना दिलासा मिळाला आहे. सरकारचा हा निर्णय क्रांतिकारक आहे. प्रशासकीय पातळीवरून लवकरच लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये रक्कम वर्ग करण्यात येईल.
- आदिती तटकरे, पालकमंत्री, रायगड
निसर्ग वादळामुळे नारळ आणि सुपारीचे नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे पूर्ण करण्यात आलेले आहेत. प्रशासनाकडे रक्कमही जमा झालेली आहे. लवकरच लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यात रक्कम वर्ग करण्यात येणार आहे.
- पांडुरंग शेळके, जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी, रायगड
नारळाचे एक झाड वर्षाला सुमारे ७ हजार रुपयांचे उत्पन्न देते. सरकारने दिलेली मदत तुटपुंजी आहे. उद्ध्वस्थ झालेला बागायतदार अशा मदतीने वर येणार नाही. - जीवन लोहार, बागायतदार, चौल