तिघा होमगार्ड भावंडासह कुटुंबातील १२ ढिगाऱ्याखाली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 07:37 AM2023-07-21T07:37:06+5:302023-07-21T07:37:48+5:30

काळाने त्यांच्यासह कुटुंबातील सर्वांना ओढून नेले.

12 in a family with three home guard siblings in Raigad irshalwadi Landslide mishap | तिघा होमगार्ड भावंडासह कुटुंबातील १२ ढिगाऱ्याखाली

तिघा होमगार्ड भावंडासह कुटुंबातील १२ ढिगाऱ्याखाली

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
इर्शाळवाडी : दरड कोसळून ढिगाऱ्याखाली गाडले गेलेल्यामध्ये एकाच कुटुंबातील तिघा सख्ख्या भावांसह १२ जणांचा समावेश आहे. हे तिघे गृहरक्षक दलात जवान म्हणून कार्यरत होते. भगवान तिरकड ( वय २७)), दिनेश तिरकड (२५) व कृष्णा (२३) अशी या तिघा भावडांची नावे आहेत. खालापूर व खोपोली पोलीस ठाण्यातर्गत ते होमगार्डची ड्युटी बजावित होते. त्यांचे आई-वडील, बहीण, दिनेशची पत्नी व दोन मुले असे कुटुंबातील सर्वजण मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. 

तिघा भावापैकी कृष्णा हा अविवाहित होता. तिघे जण कामावरुन परतल्यावर आपल्या मोटारसायकली पायथ्यावरील मोनिवली गावात परिचिताच्या घराजवळ लावत डोंगरावरील घरात जात असत. बुधवारी सांयकाळी सहाच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे परतले होते. मात्र काळाने त्यांच्यासह कुटुंबातील सर्वांना ओढून नेले.

मदतकार्यात यांचा सहभाग 
 ३ अप्पर पोलिस अधीक्षक, ४ उपविभागीय पोलिस अधिकारी, १५ पोलिस निरीक्षक, १७० पोलिस कर्मचारी.
 एनडीआरएफच्या ४ पथकांत १०० जवान, टीडीआरएफचे ८० जवान, स्थानिक पाच बचाव पथकात ५० जण.

कंपन्यांचे शेकडो कर्मचारी मदतीला
इर्शाळवाडीत यंत्र सामग्री नेणे कठीण होते. त्यामुळे बचाव पथकाच्या मदतीसाठी एल अँड टी, शापूरजी पालनजी, जे. एम. म्हात्रे कंपनीचे शेकडो कर्मचारी फावडे, घमेली घेऊन डोंगर चढून घटनास्थळी दाखल झाले होते.

आरोग्य विभागही तयारीत 
 दरड दुर्घटनेत जखमींना त्वरित उपचार मिळावे, यासाठी आरोग्य विभागाचे पथही घटनास्थळी होते. 
 जिल्हा रुग्णालय आणि जिल्हा आरोग्य विभागाचे शेकडो कर्मचारी हजर होते. मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यासाठी डॉक्टरही होते. 
 उपचारासाठी औषधे उपलब्ध करण्यात आली होती. रुग्णवाहिकाही तैनात ठेवण्यात आल्या होत्या.

पशुसंवर्धन विभागही कार्यरत
 घटनास्थळी एक सहाय्यक आयुक्त, दोन पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक व एक परिचर यांच्यासह दोन पथके तयार करण्यात आली.
 त्यांच्याकडून जखमी पशूंवर उपचार करणे, मृत पशूंचे फोटो व पंचनामे करणे, शास्त्रोक्त पद्धतीने मृत जनावरांची विल्हेवाट लावणे व जखमी जनावरांना खाद्याचे नियोजन करणे इ. कामे करण्यात आली.

Web Title: 12 in a family with three home guard siblings in Raigad irshalwadi Landslide mishap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.