लोकमत न्यूज नेटवर्कपेण : गणेशोत्सवासाठी परदेशी अनिवासी भारतीयांकडून पेणमधील आकर्षक गणेशमूर्तींची दरवर्षी मागणी असते. या वर्षीही सुमारे २५ हजार गणेशमूर्तींची मागणी असून आतापर्यंत बारा हजार मूर्ती समुद्रमार्गे विविध देशांत पाठविण्यात आल्या आहेत. नुकतीच चार हजार गणेशमूर्तींची ऑर्डर पेणच्या दीपक कला केंद्रातून अमेरिका युके, न्यूझीलंड, थायलंड, मॉरीशस या देशांत रवाना झाली.
दरवर्षी मे महिन्यातील दुसऱ्या आठवड्यापर्यंत समुद्रमार्गे बाप्पांची परदेश वारी होत असते. मान्सून अरबी समुद्रात दाखल होताच समुद्र खवळला की मूर्तींची निर्याद बंद होते. १५ मे रोजीच जेएनपीटी बंदरातून अमेरिका, युरोपकडे रवानादेखील झाल्याचे सतीश समेळ यांनी सांगितले.
एक फूट ते पाच फूट उंचीच्या गणेशमूर्ती पाठविण्यात आल्या आहेत. जेएनपीटी बंदरातून समुद्रमार्गे या बाप्पांच्या मूर्तीना पोहोचण्यासाठी साधारपणे महिन्याचा कालावधी लागतो. यावर्षी पंधरा दिवस उशिराने गणेशोत्सवाला प्रारंभ होईल. १९ सप्टेंबर रोजी गणेशोत्सवाआहे. यामुळे मूर्तिकारांना पंधरा दिवसांचा वेळ अधिक मिळाला आहे.
१४ मार्च पहिली ऑर्डर ३००० गणेशमूर्ती मॉरीशस तसेच थायलंडला रवाना झाल्या.१५ एप्रिल ५००० मूर्तींची मोठी ऑर्डर युके, न्यूझीलंड, मॉरीशस आणि थायलंडला पाठविल्या.१५ मे ४००० गणेशमूर्तींची ऑर्डर अमेरिकेसह विविध देशांत रवाना.
यावर्षी न्यूझीलंड, थायलंड, मॉरीशस, बँकॉक, ऑस्ट्रेलिया, कॅनडा पाठोपाठ अमेरिका, युरोपमधील इंग्लंड, आयर्लंड, जर्मनी, फ्रान्स या देशांतील अनिवासी भारतीयांकडून मोठी मागणी होती. विशेष म्हणजे चार व पाच फूट उंचीच्या गणेशमूर्तींना मागणी मिळाली याचे समाधान निश्चित आहे. - सचिन समेळ, मूर्तिकार, दीपक कला केंद्र पेण.