जिल्ह्यातील १२० दत्त मंदिरात दत्तगुरूंच्या नाममंत्राचा जयघोष
By निखिल म्हात्रे | Published: December 7, 2022 06:20 PM2022-12-07T18:20:37+5:302022-12-07T18:21:13+5:30
दत्त जन्मोत्सवासाठी सर्वच मंदिरात फुलांची आरास व विद्युत रोषणाई
लोकमत न्युज नेटवर्क, अलिबाग: दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबराच्या नाममंत्र घोषणाने रायगड जिल्ह्यासह परिसरातील 120 मंदिरात कोरोना काळानंतर दोन वर्षांनी दत्त जयंती साजरी करण्यात आली. सर्व भागातील दत्त मंदिरामध्ये आज भरगच्च धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनकरून दत्तजयंती मोठ्या उत्साहात व थाटात साजरी करण्यात येत आहे. त्यातच मार्गशीर्ष पोर्णिमा व मार्गशीर्ष गुरुवार हे दोन वार साधत बऱ्याच ठिकाणी महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले आहे.
दत्त जन्मोत्सवासाठी शहरातील सर्वच मंदिरात फुलांची आरास व विद्युत रोषणाई करून पहाटेपासूनच ‘दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ चा गजर सुरू होता. शहराच्या विविध भागातील दत्त मंदिरामध्ये पहाटेपासूनच दर्शनासाठी भक्तांनी गर्दी केली होती. काही मंदिरांमध्ये होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन एलईडी स्क्रीन लावल्या आहेत. त्यामुळे लाईव्ह दर्शनाची सुविधा ही उपलब्ध झाली होती.
जन्मोत्सवाचा सोहळा अनुभवण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. या सप्ताहात विविध दत्त मंदिरात भजन, कीर्तन, पारायणे, अखंड नाम सप्ताह यांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री दत्त मंदिर वेश्वी, अलिबाग येथील श्रीकृष्ण दत्त मंदिर, श्री चौल येथील दत्त जयंती स्थानिक परिसरातील मंदिरात पाळणा बांधून हजारो भाविकांच्या उपस्थितीत दत्त जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. फुलांची आकर्षक सजावट आणि दीपमाळांनी सजवलेल्या मंदिरामध्ये पहाटेपासूनच वैविध्यपूर्ण धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल आहे.
अलिबाग कोळीवाड्यातील डबरी परिवारातर्फे गेल्या अनेक वर्षापासून दत्तजयंती साजरी केली जाते. या निमित्त सरकारी नियमांचे पालन करून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. डबरी परिवारातर्फे दत्त जयंतीसाठी आज मंदीराचा गाभारा फुलांनी सुशोभित करण्यात आला होता. तसेच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.