वर्षभरात १२० कामांना मंजुरी
By admin | Published: September 30, 2015 12:14 AM2015-09-30T00:14:11+5:302015-09-30T00:14:11+5:30
सात विधानसभा सदस्य आणि तीन विधान परिषद सदस्यांचा प्रत्येकी दोन कोटी रुपयेप्रमाणे २० कोटी रुपयांचा निधी विकास कामांसाठी आला आहे
अलिबाग : सात विधानसभा सदस्य आणि तीन विधान परिषद सदस्यांचा प्रत्येकी दोन कोटी रुपयेप्रमाणे २० कोटी रुपयांचा निधी विकास कामांसाठी आला आहे. जिल्ह्यातील सात विधानसभा मतदार संघातून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना आॅक्टोबर महिन्यात एक वर्ष होत आहे. मात्र या वर्षभरात केवळ १२० कामांना मंजुरी मिळाली असून फक्त सहा कोटी १० लाख रुपयांचीच कामे मंजूर झाली आहेत. याचाच अर्थ जिल्ह्यातील विकासकामे ही धीम्या गतीने होत असल्याचे दिसून येते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन विधानसभा सदस्य आणि दोन विधान परिषद सदस्य आहेत. त्यांच्या वाटेला आलेल्या आठ कोटी निधीपैकी दोन कोटी एक लाख ४५ हजार रुपयांची ३८ कामे मंजूर झाली आहेत.
अलिबागचे शेकापचे आमदार सुभाष पाटील (० कामे मंजूर- रक्कम ०), शेकापकडे दोन विधानसभा सदस्य आणि एक विधानपरिषद सदस्य आहे. त्यांच्याकडील सहा कोटी निधीपैकी १८ लाख ९२ हजार रुपयांची फक्त पाचच कामे मंजूर आहेत.
शिवसेनेकडे दोन विधानसभा सदस्य असून चार कोटी निधीपैकी तीन कोटी ८९ लाख रुपयांची ७७ कामे मंजूर झाली आहेत.
सत्ताधारी भाजपाचे आमदार प्रशांत ठाकूर (० कामे मंजूर- रक्कम ०) भाजपाकडे एकमेव विधानसभा सदस्य आहे. त्यांच्या वाट्याला आलेल्या दोन कोटी निधीपैकी अद्यापपर्यंत एकाही कामावर साधा रुपयाही खर्च झालेला नाही. वर्षभरात अपेक्षित कामे न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. (विशेष प्रतिनिधी)
-----------
काही लोकप्रतिनिधी एकदमच विकासकामे सुचवून निधी खर्च करतात. त्यामुळे मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत संपूर्ण निधी खर्च होतो. कोणाचाच निधी शिल्लक राहत नाही.
-सुनील जाधव,
जिल्हा नियोजन अधिकारी, रायगड