उरणच्या पूनाडे शेतमाळावर सापडल्या सुमारे १२०० वर्षांपूर्वीच्या विरगळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2023 10:05 AM2023-08-23T10:05:42+5:302023-08-23T10:07:25+5:30
दुर्लक्षित इतिहासावर प्रकाश पडण्याची शक्यता!
मधुकर ठाकूर, उरण : येथील पुनाडे गावातील शेतमालावर सुमारे १२०० वर्षांपूर्वीची प्राचीन ऐतिहासिक विरगळी आढळून आल्या आहेत.कोकण इतिहास परिषद रायगड शाखेच्यावतीने उरण आणि पनवेल तालुक्यातील गावांचे पुरातत्त्वीय सर्वेक्षण सुरू आहे.या सर्व्हेक्षणात विरगळींवर कोरलेली शिल्पे आढळली आहेत .या विरगळींच्या अभ्यासानंतर दुर्लक्षित इतिहासावर नव्याने प्रकाश पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
उरणपासून पुनाडे गाव सुमारे १८ किलोमीटर अंतरावर आहे.कोकण इतिहास परिषद रायगड शाखेच्यावतीने उरण आणि पनवेल तालुक्यातील गावांचे पुरातत्त्वीय सर्वेक्षण सुरू असताना या गावातील गावदेव बहिरी मंदिराच्या जवळ असलेल्या शेतात तीन वीरगळ उभ्या असल्याचे आढळून आले आहे.पुर्वीपार असलेल्या विरगळींमुळे या परिसराला मामा-भाचे म्हणून ओळखले जाते.विरगळींचे निरीक्षण करता या तीनही विरगळी वामन पाटील या शेतकऱ्याच्या शेत माळातील मातीत उभ्या केल्या असल्याचे आढळून आले आहे.वीरगळींचा खालचा भाग मातीत गाडला आहे.
उर्वरित वरच्या भागातील विरगळींवर युद्ध करत असलेले दोन वीर आहेत.तर खालच्या चित्रात धगधगत्या रणांगणात युद्ध करणारा वीर असून मधल्या भागात तह बोलणी प्रसंगीचे चित्र कोरलेले दिसून येत आहे. खालचा भाग मातीत गाडला गेला असल्याने त्या भागाची झीज झालेली आहे. शीर्षभागी मंगल कलश असलेल्या वीरगळ शिल्पांची उंची अडीच फूट असून ते तीन ते चार टप्प्यांत विभागलेले आहेत. यातील एक वीरगळ पूर्णपणे भग्नावस्थेत आहे. उर्वरित दोन वीरगळ झीज झालेले आहेत. यातील एका वीरगळाच्या तीन बाजू कोरलेल्या आहेत.त्याच्या मधल्या टप्प्यात लढणारे योद्धे शिल्पांकित केली आहेत .शिल्पांचे नीट निरीक्षण केले असता त्यांच्या सर्वांत वरच्या टप्प्यात स्वर्गप्राप्ती झालेला वीर शिवलिंगाची उपासना करताना दाखविण्यात आला आहे. विशेष म्हणजे वीरगळावर दाखविलेल्या लाकडी नौका युद्धनौका नसून, साध्या पद्धतीच्या आहेत.
अशा नौका आजही मासेमारीसाठी स्थानिक लोक वापरताना दिसतात. याशिवाय या ठिकाणी त्या काळी वापरले गेलेले खापरांचे अवशेष आढळून आले आहेत. त्यात काचेचा लेप असलेली रंगीत, तेजस्वी लाल, पांढरी चमकदार, पांढऱ्यावर निळ्या रंगाची नक्षी असलेली अशी पूर्व मध्ययुगीन आणि मध्ययुगीन खापरे आढळून आली आहेत.
कोकण इतिहास परिषद रायगड शाखेच्या वतीने उरण आणि पनवेल तालुक्यातील गावांचे पुरातत्त्वीय सर्वेक्षण अनेक वर्षे सुरू आहे.याच सर्वेक्षणामध्ये खाडीकिनारी असलेल्या पुनाडे गावात या विरगळींवर कोरलेली शिल्पे आढळली आहेत.त्यामुळे या विभागाच्या दुर्लक्षित इतिहासावर नव्याने प्रकाश पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
यापूर्वी उरण तालुक्यातील पिरकोन येथे विरगळी तर चिरनेर,रानसई येथे गद्देगली आढळून आल्या आहेत. उरण परिसरात आढळणाऱ्या अनेक वीरगळांसारख्या स्मृतिशिलांवरून हे स्पष्ट झाले आहे की येथे सागरी मार्गाने होणारा परदेशी आणि स्थानिक व्यापार चालत असे. सापडलेल्या वीरगळावरील नौकायुद्धावरून ही बाब निश्चित होते. एकूण शिल्पशैलीवरून हे वीरगळ बाराव्या शतकातील असावीत.तसेच परिसरात आढळून आलेल्या मृदभांड खापरावरून हा परिसर दहाव्या शतकापासूनच चीन, इराण यांसोबत व्यापारातही गुंतला असण्याची शक्यता आहे.दुर्लक्षित प्राचीन विरगळींच्या अभ्यासानंतर त्यांच्या इतिहासावर आणखी प्रकाश पडण्याची शक्यता कोकण इतिहास परिषद रायगड शाखेचे अध्यक्ष आणि पुरातत्त्व अभ्यासक डॉ. अंजय धनावडे यांनी व्यक्त केली आहे.