मधुकर ठाकूर, उरण : जेएनसीएच्या कस्टम सेंट्रल इंटेलिजेंस युनिटने बंदी घातलेले चिनी फटाके, इलेक्ट्रॉनिक वस्तू, मायक्रोचिप आणि इतर प्रतिबंधित संशयित पदार्थ असल्याच्या संशयावरून १२२ कंटेनर रोखून ठेवले आहेत.हे संशयित कंटेनर बनावट मालाच्या नावाने जेएनपीए बंदरात आणण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे.
उरण परिसरातील पंजाब कॉनवेअर गोदामात आलेल्या अनेक कंटेनरची तपासणी केली असता कस्टमला या कंटेनरची विशिष्ट माहिती मिळाली होती.कर चुकवून बनावट मालाच्या नावाने व तस्करीच्या मार्गाने बंदी घातलेले चिनी फटाके, इलेक्ट्रॉनिक वस्तू, मायक्रोचिप आणि इतर प्रतिबंधित पदार्थ भरलेले हे सर्व संशयित १२२ कंटेनर एकाच जहाजातून जेएनपीए बंदरात आणण्यात आले आहेत. याआधीही त्याच एका चिनी पुरवठादाराच्या संबंधातुन प्रतिबंधित माल तस्करीच्या मार्गाने आयात करण्यात आला होता.त्यामुळे पुन्हा त्याच पुरवठादाराशी संबंधित असलेले सर्व संशयित कंटेनर होल्डवर ठेवून कसुन तपासणीसाठी सीमा शुल्क विभागाच्या सीआययु अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आले आहेत.
तपासणीत काही कंटेनर साफ केले गेले असल्याचे आढळून आले आहेत. त्यामुळे सीआययुने परिसरातील कंटेनर फ्रेट स्टेशन्स आणि कंटेनर टर्मिनल्सच्या सर्व व्यवस्थापकांना 'ईमेलद्वारे नोंदींची बिले, मूल्यांकन आणि कंटेनरची स्थिती यासह कंटेनरचे तपशील सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. रेड-लीड आणि लिथियम सारखी विषारी रसायने असलेल्या खराब-गुणवत्तेच्या विदेशी फटाक्यांचा ओघ रोखण्यासाठी सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत.मात्र त्यानंतरही चीनमधुन भारतात प्रतिबंधित फटाक्यांच्या निषिद्ध मालाची तस्करी होत असल्याचा संशय आहे.
सीआययूला मिळालेली विशिष्ट माहिती आणि त्यांच्या शोधाचा हेतू तपासात सहभागी असलेल्या काही अधिकाऱ्यांनाच माहिती आहे.त्यामुळे सीमाशुल्क विभागाने या कारवाईबाबत अद्यापही अधिकृतपणे कोणतीही माहिती जाहीर केलेली नाही.अधिकाऱ्यांना या कंटेनरशी संबंधित गोपनीय माहिती मिळाली आहे. ज्याचा खुलासा करता येणार नाही. पुढील सूचना मिळेपर्यंत १२२ संशयित कंटेनर सीसीटीव्ही व अधिकाऱ्यांच्या निगराणीत ठेवण्यात आले असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.