रायगड जिल्ह्यात १२३१ गावे-वाड्या टंचाईग्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 06:55 AM2018-04-05T06:55:01+5:302018-04-05T06:55:01+5:30
रायगड जिल्ह्यातील ३५४ गावे आणि ८७७ वाड्या अशा १२३१ ठिकाणी पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. तहानलेल्या गावे-वाड्यांची तहान भागविताना प्रशासनाने तब्बल आठ कोटी ६३ लाख रुपयांच्या पाणीटंचाई कृती आराखड्याला मंजुरी दिली आहे. यंदाचा टंचाई आराखडा हा गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये दोन कोटी ३८ लाख रुपयांनी जास्त आहे.
- आविष्कार देसाई
अलिबाग - रायगड जिल्ह्यातील ३५४ गावे आणि ८७७ वाड्या अशा १२३१ ठिकाणी पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. तहानलेल्या गावे-वाड्यांची तहान भागविताना प्रशासनाने तब्बल आठ कोटी ६३ लाख रुपयांच्या पाणीटंचाई कृती आराखड्याला मंजुरी दिली आहे. यंदाचा टंचाई आराखडा हा गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये दोन कोटी ३८ लाख रुपयांनी जास्त आहे. या आराखड्याचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे एकाही विंधण विहिरी आणि नळ पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्तीवर प्रशासनाने एक दमडीही खर्च न करण्याचे ठरवले आहे. टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी जिल्ह्यातील ३५४ गावे आणि ८७७ वाड्यांचा समावेश केला आहे. त्यासाठी पाच कोटी ३२ लाख २९ हजार रुपये, तर नव्याने विंधण विहिरी घेण्यासाठी तीन कोटी २४ लाख रुपयांच्या आराखड्याला मंजुरी दिल्याचे दिसून येते.
रायगड जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत २०१७ मध्ये चांगला पाऊस पडला आहे, असे असतानाही जिल्ह्यातील पाणीटंचाई कृती आराखड्यात तब्बल दोन कोटी ३८ लाख रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. २०१६ साली सात कोटी ८८ लाख, २०१७ साली सहा कोटी २५ लाख आणि २०१८ सालाकरिता आठ कोटी ६३ लाख रुपयांचा समावेश आहे. सरकारमार्फत जिल्ह्यामध्ये ग्रामीण पाणीपुरवठा योजनेंतर्गत कोट्यवधी रुपयांचा निधी दरवर्षी देण्यात येतो. त्यानुसार आवश्यक असणाऱ्या ठिकाणी पाणीपुरवठा योजना आखण्यात येऊन पिण्याचे पाणी पुरवण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र एवढ्या सगळ््या उपाययोजना करूनही आॅक्टोबर महिन्यापासून पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागतात.
मोठ्या प्रमाणात पाऊस पडूनही ते पाणी अडवण्यासाठी सक्षम मोठी धरणे जिल्ह्यामध्ये कित्येक वर्षांपासून उभारण्यातच आलेली नाहीत, तर दुसरीकडे अस्तित्वात असलेल्या धरणाचे पाणी मुंबई, नवी मुंबई आणि काही उद्योगांना आंदण दिल्याने जिल्ह्यामध्ये पाण्याचा ठणठणाट निर्माण होतो.
जिल्ह्यामध्ये विविध विकासकामांमुळे नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. त्यांना पिण्याचे पाणी पुरवताना प्रशासनाची चांगलीच दमछाक होताना दिसून येते.
ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. महिलांना मैलोनमैल पायपीट करून पाण्याचे हांडे डोक्यावरून आणावे लागत आहे. काही ठिकाणी तर विकतचे पाणी घेण्यावाचून नागरिकांकडे पर्याय नसल्याचे चित्र वेळोवेळी समोर आले आहे. रायगड जिल्ह्यामध्ये रोहा तालुक्यात सर्वाधिक पाणीटंचाईच्या झळा जाणवणार असल्याचे टंचाई कृती आराखड्यातून स्पष्ट होते. रोहा तालुक्यातील २० गावे आणि ३६ वाड्या अशा ५६ ठिकाणी विंधण विहिरी घेण्यात येणार आहेत. त्यासाठी ३१ लाख ३६ हजार रुपये खर्च केले जाणार आहेत. त्याखालोखाल महाड १९ गावे ६४ वाड्या अशा एकूण ८३ ठिकाणी टंचाईच्या झळा दूर करण्यासाठी ४६ लाख ४८ हजार रुपयांची तरतूद केली आहे. कर्जतमध्ये १६ गावे २२ वाड्या अशा एकूण ३८ ठिकाणी विंधण विहिरी घेण्यात येणार आहेत. त्यासाठी २१ लाख २८ हजार रुपयांचा खर्च होणार आहे.
प्रत्यक्ष टँकरने पाणीपुरवठा सुरू
पाणीटंचाईच्या प्रत्यक्ष झळा पेण तालुक्याला बसायला लागल्या आहेत. तेथील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी
लागत आहे.
त्यातून त्यांची सुटका व्हावी यासाठी प्रशासनाने १३ गावे आणि १० वाड्यांवर टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे, त्याचप्रमाणे पोलादपूर तालुक्यामध्ये दोन गावे आणि नऊ वाड्यांवर टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे.
रोहा तालुक्यामध्ये एका गावात
एका टँकरने पाणीपुरवठा केला
जात असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.
टंचाई कृती आराखड्यामध्ये विंधण विहिरी दुरुस्ती करणे, नळ पाणीपुरवठा दुरुस्ती करणे, विंधण विहिरींचे जलभरण करणे, गाळ काढणे, विहिरी अधिग्रहण करणे यासारख्या कामांवर एक दमडीही खर्च करण्यात येणार नसल्याचे आराखड्यातून स्पष्ट होते.
जिल्ह्यात सर्वाधिक टंचाई महाड तालुक्यात जाणवणार आहे. त्यासाठी ३०७ ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. पेण तालुक्यात २३३ ठिकाणी टँकर, पोलादपूर १६५ आणि कर्जत तालुक्यात १२८ ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी जिल्ह्यातील ३५४ गावे आणि ८७७ वाड्यांचा समावेश केला आहे. त्यासाठी पाच कोटी ३२ लाख २९ हजार रुपये, तर नव्याने विंधण विहिरी घेण्यासाठी तीन कोटी २४ लाख रुपयांच्या आराखड्याला मंजुरी
रायगड जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत २०१७ मध्ये चांगला पाऊस पडला आहे, असे असतानाहीजिल्ह्यातील पाणीटंचाई कृती आराखड्यात तब्बल दोन कोटी ३८ लाख रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
ताडवाडीमध्ये महिलांचे रात्रीचे जेवणसुद्धा विहिरीवर
विजय मांडे
कर्जत : कर्जत तालुक्यातील ताडवाडी या सर्वात मोठ्या आदिवासी वाडीतील महिला दररोज ३५-४0च्या गटाने पाण्यासाठी विहिरीवर मुक्काम करीत आहेत. तेथेच रात्रीचे जेवण बनवून पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी २४ तासांहून अधिक काळ ठाण मांडून बसण्याची वेळ वाडीतील आदिवासी महिलांवर आली आहे. प्रशासन त्यांना टँकरने पाणीपुरवठा करीत नसल्याने ग्रामस्थांचे जगणे कठीण होऊन बसले आहे.
पाथरज ग्रामपंचायतीमधील ताडवाडी ही ३00 घरांची वस्ती असलेली वाडी असून माळरानावर वसलेल्या लाल मातीतील या वाडीत सध्या प्यायला पाणी नाही.वाडीतील लोकांसाठी बांधलेल्या तिन्ही विहिरी कोरड्या पडल्या आहेत.त्यामुळे गावापासून २ किलोमीटर अंतरावर असलेल्या निर्जन वस्तीमधील एका विहिरीवर या वाडीतील महिलांना पाणी आणण्यासाठी जावे लागते. विहिरीने देखील तळ गाठल्याने २४ तासाहून अधिक वेळ पाण्याचा हंडा मिळविण्यासाठी लागत आहे. लोकसंख्या अधीक असल्याने येथील महिलांना पाण्यासाठी रात्र जागून काढावी लागत आहे.थेंब थेंब पाणी विहिरीत गोळा होत असून ते विहिरीतून आपल्या हंड्यात ओतून टाकण्यासाठी महिलांना करावी लागणारी कसरत वेदना देणारी आहे. दररोज ३५-४0 महिला आपला मुक्काम विहिरीवर करीत आहेत.त्यांनी पाण्यासाठी लावलेले नंबर २४ तासांनी येत असल्याने आपला नंबर हुकू नये,म्हणून या महिला रात्रीचे जेवण देखील तेथेच दगडांची चूल तयार करून शिजवतात. वाडीतील पुरु ष मंडळी,तरु ण मुले असा साधारण १00 जणांचा मुक्काम दररोज रात्री विहिरीवर असतो. पाण्यासाठी रात्र जागून काढावी लागत असल्याने ग्रामस्थांमध्ये मोठी नाराजी आहे, प्रशासन या ठिकाणी टँकर सुरू करण्याबाबत निर्णय घेत नाही. दुसरीकडे त्यांना ग्रामपंचायतीचा टँकर सुरू करण्याचा प्रस्ताव हवा आहे. अशा परिस्थितीमुळे ग्रामस्थ संतप्त झाले असून तुम्ही वाडीत येऊन परिस्थिती न पाहता आमचे हसे करीत असल्याबद्दल राग व्यक्त करीत आहेत. रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी या ताडवाडी आणि मोरेवाडीसाठी जिल्हा नियोजन मंडळातून पाणी योजना मंजूर केली आहे.मात्र २८ लाखांचे पाणी पुरवठा योजनेचे काम आजपर्यंत जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाने सुरू केले नाही. ताडवाडी-मार्गाचीवाडी यांच्यामध्ये जंगलात असलेल्या जुन्या विहिरीची दुरु स्ती करून त्यातील पाणी उचलून पाइपलाइन टाकून वाडीपर्यंत आणण्याची ती योजना आहे.विहिरीतून उचललेले पाणी दोन्ही वाडीत असलेल्या विहिरीत टाकण्याची ही योजना आहे.मात्र आॅक्टोबर २0१७ पासून मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेली नळपाणी योजना प्रत्यक्षात यायला काही महिने लागणार आहेत.त्यामुळे वाडीतील पाण्याचे दुर्भिक्ष लक्षात घेऊन प्रशासनाने टँकर सुरू करण्याची मागणी वाडीतील महिलांनी केली आहे.