- अमोल पाटील, खालापूरमुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरून प्रवास करताना खोपोलीजवळ एका कंपनीत उंचावर डौलाने फडकणारा तिरंगा पाहिल्यानंतर आपसूकच आपले हात तिरंग्याला सलाम करण्यासाठी वर येतात. पुण्याकडून मुंबईकडे येताना बोरघाट संपल्यानंतर डावीकडे व मुंबईतून पुण्याला जाताना फूडमॉल सोडल्यानंतर उजव्या बाजूला हा तिरंगा डौलाने फडकताना दिसतो. सुमारे १२५ फूट उंचीवर हा तिरंगा असून येथून प्रवास करताना तिरंग्याकडे पाहिल्यानंतर अभिमानच वाटतो. एका कंपनी मालकाने हा तिरंगा झेंडा उभा केला असून एक्स्प्रेस-वेवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी चर्चेचा विषय झाला आहे.खोपोलीजवळ साजगाव औद्योगिक परिसरात ढेकू येथे एका कंपनीवर १२५ फूट उंचीवर तिरंगा झेंडा लावण्यात आला आहे. नवी मुंबई महापालिकेनंतर राज्यात इतक्या उंचीवर लावण्यात आलेला हा दुसरा राष्ट्रध्वज आहे. अनेक प्रवासी हा तिरंगा पाहण्यासाठी काही काळ रस्त्यावर थांबतात. कंपनीचे मालक व्ही. आर. शेरीफ, रा. मुंबई यांच्या संकल्पनेतून या तिरंग्याची निर्मिती झाली आहे. देशाप्रति असलेले प्रेम व एक्सप्रेस-वेलगत कारखाना असल्याने राष्ट्रध्वज उभारण्याची संकल्पना सुचल्याचे कंपनीचे व्यवस्थापक सचिन शालिग्राम यांनी सांगितले. (वार्ताहर) दिल्लीतील एका मॉलवर देशातील सर्वात उंच आणि रात्रंदिवस तिरंगा फडवण्यात येतो. महाराष्ट्रात हा मान नवी मुंबई महापालिकेने मिळवला आहे. तर हा राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा उंच झेंडा आहे.राष्ट्रीय दुखवटा असेल तर राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात येतो. याशिवाय आपत्कालीन परिस्थिती, पूर, वादळी वाऱ्यामुळे राष्ट्रध्वज बाधित होत असेल तर तो उतरविण्यात येतो, अन्यथा दिवसरात्र हा राष्ट्रध्वज एक्स्प्रेस-वेची शान वाढवत दिमाखात डोलत असतो. जून २०१५ मध्ये झालेल्या एका कार्यक्र मात १२५ फूट उंचीवर असलेला हा तिरंगा फडकविण्यात आला. अनेक प्रवाशांना या तिरंग्याने भुरळ घातली असून मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या उत्सुकतेचा हा विषय झाला आहे.
दिमाखात फडकतोय १२५ फूट उंच तिरंगा
By admin | Published: August 14, 2015 11:39 PM