निवडणुकीसाठी १२ हजार ६९७ कर्मचारी नियुक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2019 10:53 PM2019-10-20T22:53:08+5:302019-10-20T22:55:25+5:30
रायगड जिल्ह्यातील सात मतदारसंघातील मतदान केंद्रावर १२ हजार ६९७ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील सात मतदारसंघातील मतदान केंद्रावर १२ हजार ६९७ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दिव्यांग मतदारांना ने-आण करण्यासाठी वाहन व्यवस्था, पोलीस बंदोबस्त, परिवहन महामंडळाच्या बसेस आरक्षित करण्यात आल्या आहेत.
मतदान २१ ऑक्टोबर रोजी होणार आहे. तसेच मतमोजणी २४ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजल्यापासून सुरू होणार आहे. जिल्ह्यातील मतदारसंघामध्ये १६ हजार ९०१ दिव्यांग मतदार आहेत. दिव्यांग मतदाराकरिता मतदान केंद्रावर ९१२ व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली आहे, तसेच स्वयंसेवक नियुक्त करण्यात आले आहेत. सर्वच मतदान केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर वाहतूक शाखेकडूनही वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी दक्षता घेतली जात आहे. तसेच नियोजन करण्यात आले आहे.
लोकसभा निवडणुकीप्रमाणेच या निवडणुकीतही मतदान केंद्रावर मोबाइल घेऊन जाण्यास बंदी आहे. मतदान केंद्रांवरील अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही मोबाइल नेता येणार नाही. पावसाचे सावट असल्याने प्रशासन व उमेदवारापुढे जास्तीत जास्त मतदान करण्याचे आव्हान असणार आहे. सोमवारीही पावसाची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने मतदारांना मतदान करण्यासाठी उमेदवार व प्रशासनाला कठोर मेहनत घ्यावी लागणार आहे.
पनवेलमधील १२ संवेदनशील मतदान केंद्रांवर सूक्ष्म निरीक्षक लक्ष ठेवणार आहेत. तसेच निवडणूक प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येणार असून, या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त राहणार आहे. संवेदनशील मतदार केंद्रांवर कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये, यासाठी या मतदान केंद्रावर अधिक पोलीस बंदोबस्त असणार आहे.