- आविष्कार देसाई, अलिबागसावकाराकडून कर्ज घेऊन शेती करण्याच्या परंपरेला आता छेद दिला जात आहे. जिल्हा अग्रणी बँकेच्या छताखाली असणाऱ्या २५ बँकांतील ४१३ शाखांनी शेतकऱ्यांसाठी अर्थसहाय्य केले आहे. २७ हजार ८५९ शेतकऱ्यांना १२७ कोटी रुपयांच्या कर्जाचे वाटप त्यांनी केले आहे. यामध्ये रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सर्वाधिक ६७ कोटी २० लाख रुपयांच्या कर्जाचे वाटप केले. कोकण विभागात पुन्हा अग्रस्थानी राहण्याचा मान बँक आॅफ इंडियाच्या रायगड शाखेने मिळविला आहे.जिल्ह्यातील शेतीच्या विकासातून शेतकऱ्यांना समृध्द करण्यासाठी बँक आॅफ इंडियाने विशिष्ट नियोजन केले आहे. त्यानुसार विविध बँकांना टार्गेट देण्यात आले आहे. २०१५ या आर्थिक वर्षामध्ये १३७ कोटी रुपयांचे टार्गेट देण्यात आले असून आतापर्यंत १२७ कोटी रुपयांच्या कर्जाचे वाटप केले आहे. १० कोटी रुपयांचे कर्ज अद्यापही वाटप करावयाचे शिल्लक आहे. पाच हजार रुपयांपासून एक लाख रुपयांचे कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांचा वर्ग येथे मोठ्या संख्येने विकसित झाल्याचे दिसून येते. सुमारे ८५ टक्के कर्जदार कर्जाची परतफेड मुदतीत करत असल्याचेही उघड झाले आहे.पूर्वी येथील शेतकरी खाजगी सावकारांकडून शेतीसाठी कर्ज घ्यायचा. तेथे त्याची आर्थिक कुचंबणा केली जायची. आज मात्र जिल्ह्यातील परिस्थिती बदलत आहे. अग्रणी बँकेने घेतलेला पुढाकार, नागरिकांमध्ये करीत असलेली जनजागृती यामुळे बँकांकडे पाहण्याचा कल आता बदलत आहे. २०१२ या कालावधीमध्ये ४२ कोटी रुपयांचे कर्ज शेतकऱ्यांना देण्यात आले होते. त्याचप्रमाणे २०१३- ६१ कोटी रुपये, २०१४-८१ कोटी आणि २०१५ या वर्षी १२७ कोटी रुपयांच्या कर्जाचे वाटप केले आहे. स्टेट बँक आॅफ इंडियानेही आतापर्यंत ७१५ शेतकऱ्यांना सुमारे १० कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. या आकडेवारीवरून कर्ज घेणाऱ्यांचे प्रमाण वाढल्याचे स्पष्ट होते. रायगड जिल्ह्यामध्ये सुमारे दीड लाख शेतकऱ्यांपैकी फक्त ३० हजार शेतकरीच सध्या कर्ज घेत आहेत. त्यामुळे विविध बँकांना रायगड जिल्हा ही मोठी आर्थिक बाजारपेठ असल्याचे निरीक्षण लिड बँकेने नोंदविले आहे.127 कोटी रुपयांच्या कर्जवाटपांमध्ये राष्ट्रीय बँकांचा हिस्सा हा ५१ कोटी ५६ लाख रुपयांचा आहे. खाजगी बँकांनी आठ कोटी १५ लाख, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ६७ कोटी २० लाख रुपये असे १२७ कोटी रुपयांचे कर्जाचे वाटप केले आहे. स्टेट बँक आॅफ हैद्राबाद, अॅक्सिस बँकेने एक रुपयाचेही कर्ज शेतकऱ्यांना दिेले नाही.शेतकऱ्यांचा बँकांकडून कर्ज घेण्याचा कल वाढला हे खासगी सावकारांकडून कर्ज न घेण्याचेच द्योतक आहे. ज्या बँका कर्ज देण्यास नकार देतील त्यांनी थेट माझ्याकडे तक्रार करावी. शेतकऱ्यांनी बिनव्याजी कर्जाचा लाभ घ्यावा आणि शेतीतून समृध्द व्हावे.-टी.मधुसूदन, अग्रणी बँक, जिल्हा प्रबंधक
शेतकऱ्यांना १२७ कोटींचे कर्ज
By admin | Published: September 08, 2015 12:02 AM