महाडमधील अंगणवाड्यांचे १२८ प्रस्ताव प्रलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 05:07 AM2018-10-04T05:07:10+5:302018-10-04T05:07:36+5:30
अंगणवाड्यांचे वर्ग : खासगी जागा, ग्रामपंचायत कार्यालयांमधून सुरू आहेत
सिकंदर अनवारे
दासगाव : महाड तालुक्यातील अंगणवाड्यांना स्वत:च्या मालकीच्या इमारती नसल्याने अंगणवाड्या आजदेखील खासगी, सार्वजनिक ठिकाणी भरवल्या जात आहेत. गेली अनेक वर्षात निधी प्राप्त होत नसल्याने जवळपास २२ प्रस्ताव प्रलंबित आहेत. महाडमध्ये सार्वजनिक ठिकाणी आणि खासगी जागेत भरवल्या जात असलेल्या एकूण १२८ अंगणवाड्या स्वत:च्या इमारतीपासून वंचित आहेत.
शासनाच्या एकात्मिक बाल विकास विभागाकडून बालकांच्या विकासाकरिता अंगणवाड्या चालवल्या जातात. या अंगणवाड्यांमुळे ग्रामीण भागातील बालकांच्या प्राथमिक शिक्षणाचा पाया, बालकांचे आरोग्य, बालकांचा विकास याबाबत विशेष करून लक्ष दिले जाते. याकरिता सकस आहाराबरोबरच वैद्यकीय तपासणी, कुपोषणमुक्त असे उपक्र म देखील राबवले जातात. मात्र या अंगणवाड्यांना स्वत:च्या अशा इमारतीच गेली अनेक वर्षे उपलब्ध नाहीत. महाड तालुक्यातील ग्रामीण भागात आज देखील अनेक अंगणवाड्या या खासगी, सार्वजनिक ठिकाणी भरवल्या जात आहेत.
महाड तालुक्यात ३१0 अंगणवाड्या असून या अंगणवाड्यांमधून ८,९५0 इतकी बालकांची पटसंख्या आहे. काही ठिकाणी महिला बालकल्याण विभागाच्या अंगणवाड्या बांधण्यात आल्या आहेत. मात्र काही गावांत अनेक तांत्रिक अडचणीमुळे अंगणवाड्या स्वत:च्या इमारतीपासून वंचित आहेत.
महाड हा ग्रामीण आणि दुर्गम तालुका आहे. तालुक्यातील बालकांना त्यांच्या प्राथमिक विकासाकरिता अंगणवाडी हा मुख्य स्रोत आहे. केवळ बालकांचाच विकास नाही तर महिलांच्या विकासाकरिता आणि त्यांच्या आरोग्याकरिता देखील महिला बाल कल्याण विभागाच्या अंगणवाड्या महत्त्वाची भूमिका बजावत असतात. तालुक्यात वारंवार अंगणवाड्यांचे प्रस्ताव पाठवून देखील शासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे गेली काही वर्षापासून २२ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. महाडमध्ये १८२ अंगणवाड्यांपैकी १२८ अंगणवाड्या या खासगी मालकीच्या जागेत किंवा ग्रामपंचायत कार्यालय, समाजमंदिर आदी ठिकाणी भरवल्या जात आहेत.
ग्रामीण भागात अंगणवाड्यांबाबत उदासीनताच
च्ग्रामीण भागात ग्रामपंचायत किंवा स्थानिक पातळीवरून विविध ठिकाणी पैसा खर्च केला जातो. अनेक वेळा विविध सार्वजनिक इमारतींच्या कामांकरिता निधी देखील गोळा केला जातो. मात्र, ज्या अंगणवाड्या किंवा प्राथमिक शाळांमधून बालकांचा विकास होत असतो त्या अंगणवाड्या किंवा प्राथमिक शाळांबाबत मात्र गावकरी किंवा गावातील राजकीय पुढारी उदासीनता दाखवत आहेत. विविध सामाजिक देणग्यांतून अशा इमारती बांधल्या गेल्यास बालकांचा विकास होण्यास मदतच होणार आहे. महिला बालकल्याण विभागाने देखील याबाबत विचार करून अंगणवाड्यांच्या इमारतीबाबत निधी उपलब्ध करून देणे.
बालके असुरक्षितच
च्महाड तालुका हा दुर्गम आणि वाडीवस्त्यांमध्ये वसलेला आहे. ग्रामीण भागात असलेले सार्वजनिक मालकीच्या इमारती किंवा ग्रामपंचायत कार्यालये ही गावापासून लांब किंवा साफसफाई नसलेल्या ठिकाणी असतात.
च्गवताने वेढलेल्या या इमारतींमध्ये बालकांच्या अंगणवाड्या भरवल्या जातात. अनेक इमारतींमध्ये पंखे किंवा वीज देखील उपलब्ध नसते. शिवाय अशा ठिकाणीच सकस आहाराचे धान्य देखील ठेवले जाते. यामुळे अशा इमारतींमध्ये बालकांचा विकास असुरक्षितच आहे.