महाडमध्ये हत्येप्रकरणी १३ जणांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 04:09 AM2018-05-03T04:09:44+5:302018-05-03T04:09:44+5:30
महाड तालुक्यातील साकडी मोहल्ल्यात दोन मुस्लीम कुटुंबांत झालेल्या वादात एकाची हत्या झाली आहे.
महाड : महाड तालुक्यातील साकडी मोहल्ल्यात दोन मुस्लीम कुटुंबांत झालेल्या वादात एकाची हत्या झाली आहे. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला असून, पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मंगळवारी रात्री १० वाजता ही घटना घडली. या प्रकरणी महाड औद्योगिक पोलिसांनी १३ जणांना ताब्यात घेतले आहे. त्यात दोन महिलांचाही समावेश आहे.
हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव मोहिद्दीन महमद कासिम हुर्जूक (५९) असे आहे. औद्योगिक पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील साकडी गावात मंगळवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास धनसे आणि हुर्जूक या दोन कुटुंबात वाद झाला. इब्राहिम धनसे या आजारी व्यक्तीला पाहण्यासाठी मोहिद्दीन हुर्जूक आणि त्यांचा मुलगा समीर हे गेले होते. त्यांना पाहताच आरोपींनी शिवीगाळ केली. शिवीगाळ का केली, याचा जाब हुर्जूक यांनी विचारला, यातून हा वाद पेटला. या वादातून लाठीकाठ्यांनी हाणामारी झाली. या हाणामारीत मोहिद्दीन हुर्जूक यांचा जागीच मृत्यू झाला.
महाड औद्योगिक पोलीस ठाण्याला याची खबर मिळताच पोलिसांनी साकडी गावात धाव घेतली. गावातील तणाव पाहून या ठिकाणी तत्काळ पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला. दरम्यान, मोहिद्दीन यांचा खून झाल्याने त्यांचे पार्थिव महाड ग्रामीण रुग्णालयात आणले गेले. त्या ठिकाणी शवविच्छेदन केले. मात्र, आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत पार्थिव ताब्यात न घेण्याचा पवित्रा नातेवाइकांनी घेतल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. अखेर पोलिसांनी अजगर अहमद धनसे, तौफिक अहमद धनसे, परवेझ हुसेन धनसे, मुबीन कमाला धनसे, अकिब अकबर धनसे, कमाल उमर धनसे, सुयेब मुजफ्फर धनसे, नबील परवेझ धनसे, मुअज्जम हुसेन धनसे, सक्लेन अजगर धनसे, झुल्फिक्कार फक्रुद्दीन अंतुले यांच्यासह मुबारक अजगर धनसे, फातिमा झुल्फिक्कार अंतुले या दोन महिलांवर गुन्हा दाखल केला. यातील तक्रारदार समीर हादेखील या हाणामारीत जखमी झाला आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. महाडचे पोलीस उपविभागीय अधिकारी दत्ता नलावडे, पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांनीही या ठिकाणी तत्काळ भेट दिली. दरम्यान, हुर्जूक आणि धनसे यांच्यातील वाद पूर्वीपासून धुमसत होता.