मधुकर ठाकूर, उरण: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्ताचे औचित्य साधून सोमवारी (१९ ) जुन रोजी योगा दिनाच्या दोन दिवस आधीच नौदलाचे सेवानिवृत्त कमांडो रवींद्र कुलकर्णी यांनी पत्नीसह उरण येथील जलतरण तलावात १३ फूट पाण्याखाली २२ मिनिटे विविध प्रकारची योग प्रात्यक्षिके करण्याचा संकल्प पूर्ण केला आहे.
उरणमध्ये श्री. बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुलामधील पोहण्याच्या तलावामध्ये सकाळी ११.३० वाजता माजी मरीन कमांडो रवी कुलकर्णी आणि योग प्रशिक्षिका पत्नी विदुला कुलकर्णी यांनी विविध योग प्रात्याक्षिके करण्यात सुरुवात केली. १३ फूट खोल पाण्याखाली २२ मिनिटात काही उभी आसने, तसेच पर्वतासन,त्रिकोनासन,विर्भनासन , वृक्षांसन,नटराजन,गॉडेस पोज, सिंहासन, भुजंगासन, पद्मासन, श्लोक, ओंकार, सूर्यनमस्कार तसेच वेगवेगळ्या प्रकारची आसने केली.स्कुबा डायव्हिंगचे साहित्य वापरून पाण्याखाली केला जाणारा हा योग प्रात्यक्षिकांचा देशातील बहूधा पहिलाच प्रयत्न असल्याचा दावा कुलकर्णी दांपत्यानी बोलताना केला.
याआधी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून भारतात प्रथमच १३ फूट खोल पाण्याखाली ध्वजारोहण, संचलन व शहीदांना सलामी देण्याचा यशस्वी कार्यक्रमही त्यांनी १३ फुटी खोल पाण्याखाली केला आहे.