जयंत धुळप अलिबाग : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रायगड जिल्ह्यातील तब्बल १३ शंभर वर्षांचे जुने पूल अद्याप धोकादायक असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यावरून आजही वाहतूक सुरु असल्याने जनसामान्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या दोन वर्षापूर्वी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील महाडजवळच्या सावित्री नदीवरील पूल पावसाळ््यात कोसळून ४२ जणांचा आपले प्राण गमवावे लागले होते. त्यानंतर जाग्या झालेल्या सरकारने राज्यातील सर्व पुलांच्या विशेषत: १०० वर्षांच्या जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचा निर्णय घेतला. परंतु प्राप्त अहवालानुसार या १०० वर्षांच्या जुन्या पुलांच्या दुरुस्ती कामाची अंमलबजावणी मात्र वास्तवात उतरलेली नाही. या पुलांमध्ये जिल्ह्यातील १३ पुलांचा समावेश आहे.राज्य आणि राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणाचे काम जिल्ह्यात सुरु आहे. त्यात मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. दरम्यान, या रुंदीकरणाच्या कामासाठी वापरण्यात येणारी अवजड वाहने आणि अवजड यंत्रसामग्री ने-आण करण्याकरिता जुन्या गोवा महामार्गाचाच वापर केला जात आहे. परिणामी या जुन्या महामार्गावरील जुने पूल अधिक कमकुवत होत असल्याचे सरकारी बांधकाम यंत्रणेतील अभियंत्यांनी खाजगीत बोलताना सांगितले. अशाच प्रकारे जुन्या मार्गावरील पुलाच्या वाढीव वापरामुळे कमकुवत होवून खोपोली-पाली राज्य मार्गावरील खुरावले गावाजवळील छोटा पूल रविवारच्या रात्रीच्या मुसळधार पावसामुळे सोमवारी वाहून गेल्यावर स्पष्ट झाले आहे.महाड तालुक्यातब्रिटिशकालीन जुने पूलमुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील १३ लहान आणि दोन मोठ्या ब्रिटिशकालीन शंभर वर्षांच्या जुन्या पुलांवरु न आजही अवजड वाहनांसह सर्व वाहनांची वाहतूक सुरू आहे. पनवेल ते महाड टप्प्यातील १३ लहान ब्रिटिशकालीन पूल तर काळ आणि गांधारी नदीवर मोठे ब्रिटिशकालीन पूल आहेत.९१मीटर लांबीच्या ब्रिटिशकालीन ‘मेसनरी आर्च’ पद्धतीच्या काळ नदीवरील पूल सन १८७१ मध्ये बांधण्यात आला आहे. तर ६३ मीटर लांबीच्या मेसनरी आर्च पद्धतीच्याच गांधारी नदीवरील पुलाचे बांधकाम सन १९४५ मध्ये करण्यात आले आहे.कोलाडजवळ कुंडलिका नदीवर, पालीजवळच्या अंबा नदीवर तर अलिबाग-रेवस मार्गावर खडताळ येथे जुने पूल आहेत. त्यांच्या दुरुस्तीचे वा सक्षमीकरणाचे कोणतेही काम अद्याप करण्यात आलेले नाही.दरम्यान, ब्रिटिशकालीन जुने पूल महाड तालुक्यात आहेत. त्यात काळ व गांधारी नदीवरील मेसनरी आर्च पद्धतीचे पूल असल्याची माहिती महाड उप विभागीय अभियंता पी.पी. गायकवाड यांनी दिली आहे.
डागडुजीअभावी १३ पूल धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 2:11 AM