अलिबाग - कुपोषणाचे प्रमाण कमी करणे, माता व बालमृत्यू रोखणे या मुख्य उद्देशाने राज्याच्या आदिवासी विभागाच्या वतीने महिला व बालविकास विभागाच्या समन्वयाने भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजना राबविण्यात येत आहे. याअंतर्गत रायगड जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाकडे चालू आर्थिक वर्षात ४ कोटी ११ लाख ६१ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला असून, या निधीतून गरोदर महिला, स्तनदा माता व ७ महिने ते ६ वर्षे वयोगटातील बालके अशा एकूण १३ हजार १८२ लाभार्थींना लाभ मिळणार आहे.रायगड जिल्ह्यातील कर्जत, पेण, पनवेल, रोहा, खालापूर, सुधागड या सहा तालुक्यांमध्ये भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजना राबविण्यात येत आहे. रायगड जिल्ह्यात हा प्रकल्प राबविण्यासाठी चालू आर्थिक वर्षात ४ कोटी ११ लाख ६१ हजार ५०० रुपये निधीची मागणी सरकारकडे करण्यात आली होती. यामधील १ कोटी २ लाख ९० हजार रुपये निधी ऑगस्ट महिन्यापर्यंत दोन टप्प्यांमध्ये प्राप्त झाला होता. यामुळे उर्वरित निधी प्राप्त व्हावा यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडून राज्य सरकारकडे पत्रव्यवहार करण्यात आला होता. त्यानुसार उर्वरित ३ कोटी ८ लाख ७१ हजार ५०० रुपयांचा निधी सरकारकडून महिला व बाल कल्याण विभागाला प्राप्त झाला आहे. प्राप्त निधीपैकी १ कोटी ९ हजार ५७० रुपयांचा निधी वितरित करण्यात आला असून, उर्वरित निधीचे वितरण लवकरच करण्यात येणार आहे. योजनेचे वैशिष्ट्यअंगणवाडीत गरोदर महिलेची नोंद झाल्यापासून तिचे जन्मलेले बाळ सहा महिन्यांचे होईपर्यंत आठवड्यातील सहा दिवस चौरस आहार असलेले एक वेळचे जेवण देण्याची तरतूद तसेच सहा महिने ते सहा वर्षापर्यंतच्या बाळाला दररोज एक उकडलेले अंडे देण्याची तरतूद या योजनेत आहे. आहाराचे स्वरूपया योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या एक वेळच्या पूर्ण आहारामध्ये चपाती अथवा भाकरी, भात, कडधान्ये-डाळ, सोया दूध (साखरेसह), शेंगदाणा लाडू (साखरेसह), अंडी अथवा केळी अथवा नाचणी हलवा, फळे, हिरव्या पालेभाज्या, खाद्यतेल, गूळ अथवा साखर, आयोडिनयुक्त मीठ, मसाला इत्यादींचा समावेश असेल. तसेच हा आहार खरेदी करण्यासाठी एका अंगणवाडीसाठी एक अशी चार सदस्यीय आहार समिती नियुक्त करण्यात येईल. कुपोषणावर मात करण्यासोबतच माता व बालमृत्यू रोखणे हे अमृत आहार योजनेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. या योजनेत जिल्ह्यातील सहा तालुक्यांमधील २८३ अंगणवाड्या समाविष्ट करण्यात आल्या आहेत. योजनेत जिल्ह्यातील उर्वरित तालुकांच्या समावेश करण्यात यावा यासाठी प्रयत्न करण्यात येतील. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात आवश्यक त्या सूचना प्रकल्प तसेच अधिकारी व कर्मचारी यांना देण्यात आल्या आहेत.- डॉ. किरण पाटीलमुख्य कार्यकारी अधिकारी अमृत आहार योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेंतर्गत समाविष्ट भागात गरोदर माता, स्तनदा माता, ६ वर्षांपर्यंतची बालके यांना नियमितपणे आहार देण्यात येत असून, नियमितपणे योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला जात आहे. तसेच जास्तीत जास्त लाभार्थींपर्यंत पोहोचण्यासाठी योजनेसंदर्भात जनजागृती करण्यात येत आहे. - गीता जाधव, सभापती, महिला व बाल कल्याण समिती, जिल्हा परिषद, रायगड भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजना लाभार्थी दृष्टिक्षेपयोजनेंतर्गत येणारे तालुके : ६प्रकल्प संख्या : ८अंगणवाड्या : २८३गरोदर महिला : ९२४स्तनदा माता : १ हजार ९७७ महिने ते ६ वर्ष वयोगटातील बालके : ११ हजार १६१
अमृत आहार योजनेचे 13 हजार लाभार्थी, रायगड जिल्ह्यासाठी चालू आर्थिक वर्षात ४ कोटी ११ लाख रुपयांचा निधी प्राप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2021 12:45 AM