१३०० कर्मचारी २०० मतदान केंद्रावर रवाना
By admin | Published: February 21, 2017 06:23 AM2017-02-21T06:23:01+5:302017-02-21T06:23:01+5:30
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मंगळवार, २१ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी
पनवेल : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मंगळवार, २१ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी प्रशासनाची पूर्ण तयारी झाली असून, १३०० कर्मचारी २०० मतदान केंद्रावर मतदान यंत्र घेऊन रवाना करण्यात आले. पनवेल तालुक्यात ८९,९१२ महिला व ९५,६७९ पुरु ष मतदार असे एकूण १,८५,५९१ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
पनवेल तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ८ जागांसाठी २३ व पंचायत समितीच्या १६ जागांसाठी ३९ उमेदवार रिंगणात आहेत. जिल्हा परिषदेच्या केळवणे व वडघर येथे शेकापपक्ष व शिवसेनेच्या उमेदवारांत सरळ लढत होणार आहे. वावजे व नेरे येथे तिरंगी लढत सेना, भाजपा व शेकापपक्षात होणार आहे. पाली देवदमध्ये चौरंगी लढत होणार असून, येथे भाजपा, शेकापपक्ष, बहुजन समाज पार्टी व भारिप बहुजन समाज पार्टी या उमेदवारांमध्ये लढत होईल. गव्हाणमध्ये सेना, भाजपा, शेकापपक्ष व दोन अपक्ष अशी लढत होणार आहे.
पंचायत समितीसाठी १६ जागांसाठी भाजपा १४, सेना ८, शेकापपक्ष ११, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ४ व अपक्ष २ उमेदवार रिंगणात आहेत. चिंध्रण, नेरे, पाली देवद, पळस्पे, कोन, पोयंजे, करंजाडे, वडघर, केळवण व आपटा या १० ठिकाणी दुरंगी लढत, वावंजे, आदई, विचुंबे, गुळसुंदे व वहाळ या ५ ठिकाणी तिरंगी लढत व गव्हाणला चौरंगी लढत होणार आहे. पोयंजे, करंजाडे, या दोन ठिकाणी भाजपाने माघार घेतली आहे. शेकापपक्षाने ४ जागा आघाडीसाठी सोडल्या आहेत. (वार्ताहर)