उरणमधील जासई, चिरनेर, दिघोडे या तीनही ग्रामपंचायतींच्या ४४ जागांसाठी १३४ उमेदवारी अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 08:20 PM2023-10-20T20:20:58+5:302023-10-20T20:21:11+5:30
उरण तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांनी दिली माहिती
मधुकर ठाकूर, उरण : उरण तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच आणि ४४ सदस्य पदासाठी शुक्रवारी (२०) शेवटच्या दिवशी १३४ उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याची माहिती उरण तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांनी दिली. उरण तालुक्यातील मुदत संपुन प्रशासनाकडे सुपुर्द करण्यात आलेल्या जासई,चिरनेर आणि दिघोडे या तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुका ५ नोव्हेंबर रोजी होणार आहेत.शुक्रवारी (२०) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती.
या शेवटच्या दिवशी जासई ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी ६ तर १७ सदस्यपदासाठी ६७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.चिरनेर ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी ४ तर १५ सदस्यपदासाठी ३३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.दिघोडे ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी ४ तर ९ सदस्यपदासाठी २० उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.असे तीनही ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी १४ तर तीनही ग्रामपंचायतींच्या ४४ सदस्यपदासाठी १२० असे एकूण १३४ उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याची माहिती उरण तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांनी दिली.
शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख होती.त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी विविध राजकीय पक्षांचे पुढारी, नेते,उमेदवार,त्यांचे समर्थक पक्षांचे झेंडे फडकावत एकत्रितपणे आले होते.तीनही ग्रामपंचायतींचे भाजप समर्थक उमेदवारांनी आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केले.उमेदवार आणि त्यांच्या राजकीय समर्थकांसह उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आल्याने उनप कार्यालयातील आवारात गर्दी झाली होती.