नवरा-बायकोच्या भांडणाच्या 135 तक्रारी, रायगड पोलिसांकडून ‘भरोसा’ सेल सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2020 11:34 PM2020-12-20T23:34:47+5:302020-12-20T23:35:28+5:30
Raigad : कौटुंबिक हिंसाचारात घट व्हावी म्हणून प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला सेल सुरू केले. लैंगिक शोषण किंवा अन्य प्रकारच्या हिंसाचाराला बळी पडलेल्या पीडित महिला अथवा मुलीला न्यायासाठी दारोदार फिरावे लागते.
- निखिल म्हात्रे
अलिबाग : हुंडाबळी आणि कौटुंबिक हिंसाचारासारख्या प्रकरणात अनेक महिलांना न्यायासाठी वणवण भटकावे लागते. योग्य वेळीच मार्गदर्शन आणि समुपदेशन मिळण्यासाठी रायगड पोलिसांनी ‘भरोसा’ सेल सुरू केला आहे. यामध्ये कौटुंबिक कलहाच्या प्रकरणांमध्ये समेट घडवून आणला जात आहे. मात्र, भरोसा सेलला आणखी सकारात्मक काम करण्याची गरज आहे.
कौटुंबिक हिंसाचारात घट व्हावी म्हणून प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला सेल सुरू केले. लैंगिक शोषण किंवा अन्य प्रकारच्या हिंसाचाराला बळी पडलेल्या पीडित महिला अथवा मुलीला न्यायासाठी दारोदार फिरावे लागते. बलात्कार पीडित महिला अथवा मुलीला समाजासोबतच अनेकदा नातेवाइकांकडूनही तिरस्काराची वागणूक मिळते. त्यामुळे ती शारीरिक व मानसिकरीत्या खचते. हक्क मागणाऱ्या विधवा, घटस्फोटाच्या घटनांमधील महिलांचेही असेच होते. तिच्या अगतिकतेचा गैरफायदा घेण्याचेही प्रकार घडतात. महिलांप्रमाणेच ‘भरोसा सेल’ पुरुषांनादेखील मदतनीस ठरत आहे. हैदराबादच्या धर्तीवर महाराष्ट्रात भरोसा सेलचा प्रयोग प्रथमच नागपुरात राबविला होता. याला नागपूरकरांचा प्रतिसाद मिळाला आहे. याच धर्तीवर रायगड जिल्ह्यात भरोसा सेल सुरू करण्यात आला आहे.
३२ प्रकरणांत समेट
भरोसा सेलमध्ये दाखल करण्यात आलेल्या तक्रारींचा अभ्यास करून तक्रारदारांना समुपदेशन करण्यात आले. तक्रारदार व समोरील व्यक्तीचे म्हणणे ऐकून दोघांनाही जबाबदारीची जाणीव करून देण्यात आली. त्यामुळे १३५ तक्रारींपैकी ३२ प्रकरणांत समेट घालण्यात भरोसा सेलला यश आले आहे. जिल्ह्यातील महिला व युवतींच्या छेडछाडीचे गुन्हे पाहता दामिनी पथकाला पुन्हा ॲक्टिव्ह होणे गरजेचे आहे, अन्यथा भरोसा सेलवर महिलांना ‘भरोसा’ राहणार नाही.
नवरा - बायकोतील भांडणाची कारणे
घरात वेळ न देणे, सतत मोबाइलचा वापर, एकमेकांमधील गैरसमज ही
नवरा - बायकोतील भांडणाची मुख्य कारणे आहेत. यामुळे नात्यामध्ये दूरावा निर्माण होत आहे.
हुंडाबळी आणि कौटुंबिक हिंसाचारासारख्या प्रकरणात अनेक महिलांना कुठे व कसा न्याय मागावा हेच अनेकदा समजत नाही. त्याचप्रमाणे त्यांचे वेळीच समुपदेशन होणे गरजेचे असते. कुणाच्या सुखी संसाराला तडा जाऊ नये, यासाठी दोन्ही कुटुंबीयांचे ‘भरोसा सेल’मध्ये समुपदेशन करण्यात येते. समुपदेशन करूनही त्यांचे समाधान न झाल्यास शेवटी गुन्हा दाखल करण्यात येतो. विवाह करताना वर-वधू पक्षांकडील जन्मपत्रिका पाहण्याऐवजी वैद्यकीय तपासणी करणे गरज आहे.
- अशोक दुधे, पोलीस अधीक्षक रायगड