रायगडमधील पर्यटनस्थळांसाठी १३७ कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 03:21 AM2018-07-23T03:21:25+5:302018-07-23T03:22:08+5:30

विकास आराखडा तयार : कामाच्या प्रस्तावानुसार निधी वितरीत होणार

137 crores funds for tourists in Raigad | रायगडमधील पर्यटनस्थळांसाठी १३७ कोटींचा निधी

रायगडमधील पर्यटनस्थळांसाठी १३७ कोटींचा निधी

Next

- आविष्कार देसाई 

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचा विकास करण्यासाठी पर्यटन आराखडा तयार करण्यात आला आहे. अलिबाग आणि मुरुड तालुक्यातील पर्यटनस्थळांचा विकास करण्यासाठी सरकारने १३७ कोटी सात लाख ५५ हजार रु पयांचा निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती भाजपाचे अलिबाग मुरुड विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी दिली.
अलिबाग येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. रायगड जिल्हा पर्यटन आराखडा आणि त्यासाठी उपलब्ध झालेला भरीव निधी याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत दिली. या वेळी सतीश लेले, उदय काठे, महेश मानकर, सुनील दामले, परशुराम म्हात्रे आदी भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.
रायगड जिल्ह्यातील नैसर्गिक सौंदर्यामुळे देश-विदेशातील पर्यटक रायगड जिल्ह्यात येत असतात. या पर्यटकांना उत्तम सुविधा मिळाव्यात, यासाठी सरकारचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर या वाढत्या पर्यटनाला रोजगाराची जोड लाभावी हा प्रामाणिक प्रयत्नही सरकारचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आराखड्याच्या मान्यतेनुसार सरकारने पर्यटन विकासासही निधीची उपलब्धता करून दिली आहे. यामध्ये अलिबाग, मुरुड तालुक्यातील पर्यटनस्थळांचा विकास करण्यासाठी १३७ कोटी सात लाख ५५ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. पर्यटन विकासकामाच्या प्रस्तावानुसार निधी वितरीत केला जाणार असल्याचे अ‍ॅड. मोहिते यांनी सांगितले.
पर्यटनाबरोबरच अलिबाग, मुरु ड तालुक्यातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारे प्रश्न आणि सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्यावर भर देणार असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. अलिबाग तालुक्यातील बहुचर्चित असणारा सांबारकुंड मध्यम प्रकल्पाचा प्रश्न मार्गी लावण्यात भाजपाला यश आले आहे. बाधितांच्या जमिनीच्या मोबदल्याचा निधी रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. बाधितांना मिळणाऱ्या निधीच्या रकमेपैकी ३० कोटी रुपये जिल्हा प्रशासनाकडे वर्ग झाले आहेत. हा जमीन संपादनाचा निधी लवकरात लवकर वितरीत करण्याचे आदेश सरकारने जिल्हाधिकारी रायगड यांना दिले आहेत, असेही त्यांनी सांगितले.
उसर खानाव परिसरातील एमआयडीसीमध्ये संपादित करण्यात आलेल्या जमिनीच्या वाढीव मोबदल्याचा प्रलंबित असणारा प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भातील बैठक संपन्न झाली आहे. या बैठकीत वाढीव दर मिळवून देण्यासंदर्भात सरकार सकारात्मक असल्याचे अ‍ॅड. मोहिते यांनी सांगितले.
 

Web Title: 137 crores funds for tourists in Raigad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.